सांगली : ‘चला निर्धार करूया, आपली सांगली कचरामुक्त करूया’ हे ब्रीदवाक्य घेऊन कृतिशील पावलांसह डझनभर युवकांनी एकत्रित येऊन स्वच्छतेची अनोखी यात्रा सांगलीत सुरू केली. तब्बल महिनाभर हे तरुण हातात झाडू घेऊन अस्वच्छ उपनगरांचा कायापालट करू लागले आहेत. या मोहिमेत आस्थेचे अस्तित्व असल्याने, याचे कौतुक करीत नागरिकही यात्रेत सहभागी होऊ लागले आहेत.
स्वच्छतेच्या विषयावर काम करणारे अनेकजण असले तरी, कुणी स्वच्छता दिन साजरा करतो, तर कुणी सप्ताह साजरा करतो. त्यामुळे नागरिकांना अशा चमकोगिरीच्या मोहिमांबद्दल फारसे काही वाटत नाही. मात्र परिसराचा कायापालट कसा होऊ शकतो, हे दाखविण्याच्या आणि नागरिकांच्या मनात स्वच्छतेबद्दलची जागृती करण्याच्या उद्देशाने काही तरुण एकत्र आले. त्यांनी निर्धार संघटना स्थापन करून त्याअंतर्गत ही स्वच्छता यात्रा सुरू केली. सुरुवातीला अस्वच्छ परिसराची छायाचित्रे त्यांनी काढली आणि तेथे स्वच्छता करून, स्वच्छ झालेल्या परिसराचीही छायाचित्रे घेतली. लोकांना ती दाखविण्यास सुरुवात केल्यानंतर या मोहिमेचे कौतुक त्यांना वाटू लागले.
या तरुणांनी गेला महिनाभर अखंडित स्वच्छता यात्रा सुरू ठेवली आहे. महाराष्टÑदिनी १ मे रोजी मोहिमेला प्रारंभ केला. विश्रामबाग परिसरातील स्फूर्ती चौक, शंभरफुटी रोड, ऐंशी फुटी रोड, हसनी आश्रम रस्ता, एमएसईबी रस्ता, वालचंद महाविद्यालय परिसर, शहीद अशोक कामटे चौक, धामणी रस्ता, नेमिनाथनगर, दत्तनगर येथे मोहीम राबवून परिसराचा कायापालट करून दाखविला. गलिच्छ वाटणारे, दुर्गंधी पसरविणारे उपनगरांचे कोपरे, कचरा कोंडाळ्याचा परिसर, दुर्लक्षित सार्वजनिक जागा अशा ठिकाणी स्वच्छता केली.
..तर शहराचे रुपडे बदलेलआता अनेक लोकही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू लागले आहेत. स्वच्छता यात्रेचा विस्तार लोकसहभागातून आणखी वाढविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. मोजक्या तरुणांच्या गटाकडून इतका मोठा परिसर स्वच्छ होऊ शकतो, तर लाखो नागरिकांच्या सहभागाने शहराचे रूपडे बदलू शकेल, असा विचारही ते मांडत आहेत.
या तरुणांचा सहभाग...संघटनेचे राकेश दड्डण्णावर, प्रवीण पाटील, सतीश कट्टीमणी, सूरज कोळी, मनोज नाटेकर, प्रथमेश खिलारे, आदित्य अंकलखोपे, नयन कोलप, अजेश राठोड, सागर पवार, दीपक कोळी, रोहित खराटे या तरुणांनी ही मोहीम सुरू केली आहे. जिद्द आणि चिकाटीमुळे त्यांच्या मोहिमेला आता प्रतिसाद मिळत आहे.सांगलीच्या काही तरुणांनी निर्धार संघटना स्थापन करून स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे. गेला महिनाभर ती अखंडितपणे सुरू आहे.