फोटो ओळी : इंधन, गॅस दरवाढीविरोधात मदनभाऊ युवा मंचच्या वतीने सिलिंडर, दुचाकी फासाला लटकवत अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी आनंद लेंगरे, शीतल लोंढे, शेखर पाटील, नगरसेवक संतोष पाटील, प्रकाश मुळके, मयूर बांगर, हाजीतौफीक बिडीवाले उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पेट्रोल, डिझेलसह गॅसवाढीविरोधात सोमवारी मदनभाऊ युवा मंचच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. काँग्रेस भवनासमोरील झाडाला दुचाकी व सिलिंडर लटकवत दरवाढीचा निषेध केला. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे, नगरसेवक संतोष पाटील, प्रकाश मुळके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. याबाबत लेंगरे म्हणाले की, इंधन व गॅसदरवाढीने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. याला सर्वस्वी केंद्रातील भाजप सरकार जबाबदार आहे. केंद्रातील मोदी सरकार महागाई कमी करतो असे सांगून सत्तेवर आले. पण महागाई कमी होण्याऐवजी गगनाला भिडली आहे. सर्वसामान्य जनतेच्या अन्नात माती कालवायचे काम भाजप सरकारकडून होत आहे. डिझेलचे दर वाढल्यामुळे सर्वच क्षेत्रात महागाईचा आगडोंब उसळला आहे. उज्ज्वला गॅस योजनेचा बडे जाव करणाऱ्या भाजपने गॅसचा दर ८३० रुपये इतका केला आहे. खेड्यापाड्यात, आदिवासी भागातील लोकांनी गॅस सिलिंडरचा काडीमोड करून चुलीकडे वळले आहेत. कुठे गेली उज्ज्वल गॅस योजना, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. महागाई कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अन्यथा मदनभाऊ पाटील युवा मंचच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी शीतल लोंढे, शेखर पाटील, मयूर बांगर, हाजीतौफीक बिडीवाले, राम कुट्टे, दिनेश सादीगले, जुनेद महात, प्रथमेश भंडे, सुजित लकडे, नितीन भगत, प्रवीण निकम, महेश कर्णे, जयराज बर्गे, अमर निंबाळकर, चिंटू पवार, अक्षय दौडमणी, महेश पाटील, नेमिनाथ पाटील, अनुप असावा, शानूर शेख, शरद गाडे, संतोष कुरणे आदी उपस्थित होते.