लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका शासनाने पुढे ढकलल्याने जिल्हा बँक संचालकांना पुन्हा मुदतवाढ मिळाली आहे. बँकेच्या इतिहासात प्रथमच पदाधिकारी व संचालकांना ६ वर्षाहून अधिक काळ काम करण्याची संधी मिळाली आहे. हा एकप्रकारचा विक्रम नोंदला गेला आहे.
राज्यातील सहकारी संस्थांसह सांगली जिल्हा बँकेची निवडणूक पुन्हा पुढे गेली आहे. विद्यमान अध्यक्षासह संचालक मंडळाला आणखी सहा महिने मुदतवाढ मिळण्याची शक्यता असल्याने त्यातून कार्यकाळाचा विक्रम नोंदला गेला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी संस्थांच्या ठरावाची प्रक्रिया सध्या सुरु होती. ती स्थगित झाली आहे.
बँकेची निवडणूक गेल्या वर्षी मार्चमध्ये होणार होती. पण कोरोना संसर्गामुळे मार्च २०२० मध्ये राज्य सरकारने निवडणुकीला एक वर्ष स्थगिती दिली. त्यानंतरही टप्प्याटप्प्याने शासनाने निवडणुका लांबणीवर टाकल्या. गेल्या दोन-तीन महिन्यांत कोरोनाचा नियंत्रणात आल्यानंतर सहकार विभागाने निवडणूक प्रक्रिया सुरु केली होती. त्यानुसार विभागीय सहनिबंधकांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. एप्रिलअखेर किंवा मे महिन्यात निवडणूक होणार होती. त्यासाठी सहकारी सोसायट्यांनी ठराव पाठविण्यास सुरुवात केली होती. बहुतांश सोसायट्यांनी ठराव पाठविले होते.
मात्र पुन्हा कोरोनामुळे राज्य शासनाने मार्चपर्यंत निवडणुकांना स्थगिती दिली. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक एक महिना पुढे जाणार आहे. परंतु हा कालावधी पावसाळ्यात येतो. पावसाळ्यात कोणत्याही निवडणुका घ्यायच्या नाहीत, असे संकेत आहेत. सांगली जिल्ह्यात पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होत असल्याने बँकेची निवडणूक लागण्याची शक्यता कमी आहे. तसेच त्यानंतरही कोरोनाची साथ कमी झाली नाही. निवडणूक अजूनही पुढे ढकलली जाऊ शकते. त्यामुळे निवडणूूक कार्यक्रम आक्टोंबर किंवा नोव्हेंबरमध्ये लागण्याची शक्यता आहे. विद्यमान संचालक मंडळाला आणखी जवळपास सहा महिने मुदतवाढ मिळणार आहे.
चौकट
अध्यक्षपदाचा विक्रम
जिल्हा बँकेत सर्वाधिक काळ अध्यक्षपदी राहणाऱ्यांच्या यादीत विद्यमान अध्यक्ष दिलीपतात्या पाटील पहिल्या चारमध्ये आले आहेत.