सहदेव खोत -- पुनवत -चिंचोली (ता. शिराळा) येथील काष्ठशिल्पकार व ‘बालभारती’चे चित्रकार अशोक जाधव यांच्या कलादालनाची कलाप्रेमींना दिवसेंदिवस भुरळ पडत आहे. जाधव यांनी दालनात नव्यानेच बनविलेली, शिराळ्याचे भूषण नागराज, कोंबडी, मोर व त्याचे पिलू, रानगवा अशी अनेक अफलातून काष्ठशिल्पे, पेंटिंग्ज व पिंपळ पानावरील चित्रे पाहिल्यानंतर, हे कलादालन म्हणजे जणू निसर्ग कलाकृतींची अनोखी शाळाच असल्याचे वाटून जाते.चिंचोली हे कोकरूडपासून एक किलोमीटरवर असलेले छोटेसे गाव. या गावातील चित्रकार व काष्ठशिल्पकार अशोक जाधव यांनी कलेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख निर्माण केली आहे. व्यवसायाने शिक्षक असलेले जाधव मूळचे चित्रकार. ‘बालभारती’च्या सातवीच्या मराठीच्या पुस्तकातून ते सर्वदूर गेले आहेत. मात्र अलीकडच्या काही वर्षात काष्ठशिल्प बनविण्याची कलाही त्यांनी जपली आहे. एकेका काष्ठशिल्पाची निर्मिती करीत जाधव यांनी घरी सुंदर व अफलातून कलादालन साकारले आहे. निसर्गात काय दडलेय याची प्रचिती त्यांचे कलादालन पाहिल्यानंतर होते. पिंपळ पानावरील असंख्य चित्रे, पेंटिंग्ज व कोंबडा, गणपती, गोलंदाज, हरीण, सर्प, बदक, अशी त्यांची असंख्य काष्ठशिल्पे कलाप्रेमींना भारावून टाकतात. या कलादालनाला प्रतिवर्षी शालेय विद्यार्थी, सर्व क्षेत्रातील मान्यवर भेट देतात. अलीकडेच जाधव यांनी शिराळ्याची ओळख असलेला नागराज, एकाच काष्ठातून मोर व त्याचे पिलू अशा शिल्पांची भर घातली आहे. कलारसिकांसाठी पर्वणी असलेल्या या कलादालनाला ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ, इंदुमती जोंधळे, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, लेखक विश्वास पाटील, पोलिस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, लेखक चंद्रकुमार नलगे, महावीर जोंधळे, दिग्गजांनी भेट देऊन जाधव यांचे कौतुक केले आहे.अशीही दृष्टी...अशोक जाधव मित्राकडे गेले होते. तेथे चुलीत लाकूड जळत असताना जाधव यांची दृष्टी जळणाऱ्या लाकडावर स्थिरावली. त्या लाकडात कलाकृती दडलेली आहे, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी ते लाकूड विझवून घरी आणले व त्यातून छोटे हरिण हे काष्ठशिल्प साकारले.
चिंचोलीत निसर्ग कलाकृतींची अनोखी शाळा
By admin | Published: April 19, 2016 11:53 PM