सांगली : बुर्ली (ता. पलूस) येथील शेतकरी प्रभाकर पाटील व महादेव पाटील यांनी आपल्या खिलार जातीच्या गाईचे डोहाळे जेवण घातले. यावेळी गावातील महिलांनी गाईची ओटी भरली. विशेष म्हणजे गाईच्या डोहाळे जेवणासाठी गावातील १५० ते २०० महिलांनी उपस्थिती लावली.प्रभाकर पाटील हे पोटच्या मुलीप्रमाणे आपल्या गाईचा सांभाळ करीत असून, या गाईचे डोहाळे जेवण घालून त्यांनी, प्राणीमात्रावर दया करा, त्यांना माणसाप्रमाणेच वागणूक द्या, अशी शिकवण दिली आहे. त्यांनी गाईच्या डोहाळे जेवणात नऊ प्रकारच्या दुरड्या केल्या होत्या.
त्यांनी बाजरीची भाकरी, धपाटी, पुरणपोळी, शंकरपाळी, लाडू, चकली, गाईला कापड नारळ, फळे आदी पदार्थ ठेवले होते. तसेच त्यांनी गावातील लोकांना शिरा, भात, भाजी, आमटीचे जेवण घातले.
दारात मंडप घालून गाईला सजविण्यात आले होते. ग्रामीण भागात फक्त महिलांचा ओटीभरण कार्यक्रम होतो. पण महिलांनी या गाईचे पूजन केले. त्यास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विधिवत हे डोहाळे जेवण पार पडले.