सांगली : लग्नसमारंभात पायदळी तुडविल्या जाणाऱ्या अक्षता आणि अन्नाची नासाडी होत असल्यामुळे या गोष्टींना फाटा देऊन तांदळाऐवजी फुलांच्या अक्षता आणि वस्तूंऐवजी पुस्तकांचा रुखवत देऊन मराठा समाजाने नवा पायंडा पाडला आहे. शिवाय, यातून वाचलेला तांदूळ अंधशाळा व अनाथालयाला देऊन सामाजिक कार्याचा वस्तुपाठही निर्माण केला.मराठा सोशल ग्रुपचे मार्गदर्शक ए. डी. पाटील यांच्या नात्यातील मिरज तालुक्यातील करोली (एम) येथील यशवंत नामदेव पाटील यांची कन्या योगिता आणि आष्टा येथील दिलीप शिवाजी माने यांचे पुत्र रोहन यांचा हा अनोखा विवाह सोहळा विट्यात पार पडला. विवाहाच्या तयारीवरून बराच विचारविनिमय झाला. सत्यशोधक चळवळीत काम करणाºया ए. डी. पाटील यांनी वधू आणि वर पक्षाकडील सर्वच कुटुंबियांचे प्रबोधन केले. या लग्नात अक्षतांच्या जागी फुले बरसली आणि संसारोपयोगी साहित्याच्या रुखवताला हद्दपार करून ज्ञानरूपी संसारसमृद्धीचा मंत्र देत पुस्तकांचा रुखवत तयार झाला. फुलांचा सडा अक्षतांच्या माध्यमातून पडला. त्यामुळे तांदळाची नासाडी टळली असून हा उपक्रम अनुकरणीय आहे.या अनोख्या विवाहसोहळ्यामुळे परिसरात सत्यशोधक चळवळीचा वारसा अजूनही जिवंत असल्याची प्रचिती येत होती. विवाहासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींमध्येही या उपक्रमाचे कौतुक होताना पहायला मिळाले.विचारांचा जागरया विवाह सोहळ्यात विचारांचा जागरही करण्यात आला. अशा पद्धतीचा परंपरेला छेद देणारा विवाह का करावा लागला, महात्मा फुले यांनी मांडलेले विचार काय आहेत, प्रगतीचा कोणता मार्ग निवडायला हवा, अशा अनेक बाजूंनी विचारमंथन झाले.प्रत्येक लग्नात सरासरी ५ किलो तांदळाच्या अक्षता केल्या जातात. महाराष्टÑात दरवर्षी सुमारे चार लाख लग्ने होतात. प्रत्येक समारंभाचा विचार केला तर, अक्षतांच्या माध्यमातून दरवर्षी महाराष्टÑात २० लाख किलो तांदूळ पायदळी तुडवून वाया घालवितो. दुसरीकडे दुर्गम भागातील लहान मुले अन्नावाचून कुपोषित आहेत.
अनोखा विवाह सोहळा; फुलांच्या अक्षता अन् पुस्तकांचा रुखवत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 1:31 AM