लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजप, काँग्रेस आणि राष्टÑवादीच्या संयुक्त आघाडीला दणका दिला. ‘स्वाभिमानी’च्या सुरेखा आडमुठे यांनी अनपेक्षित विजय खेचून आणत संयुक्त आघाडीतील रयत विकास आघाडीच्या सुरेखा जाधव यांचा पराभव केला. उर्वरित १२ जागांवर संयुक्त आघाडीचे उमेदवार विजयी झाले. ‘स्वाभिमानी’ने काँग्रेस-राष्टÑवादीच्याच मदतीने रयत आघाडीचे नेते कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना शह दिला.जिल्हा नियोजन समितीच्या २७ जागांसाठी निवडणूक लागली होती. त्यापैकी नगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषद गटातील अनुसूचित जाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातील १४ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित तेरा जागांसाठी सोमवारी (दि. ४) मतदान झाले होते. बुधवारी सकाळी १० वाजता जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात मतमोजणी झाली. पहिल्या फेरीमध्ये खुल्या गटातील भाजपचे सुरेंद्र वाळवेकर (११०० मते), तम्मणगौडा रवी-पाटील (१०००), शिवसेनेचे सुहास बाबर (१०००), राष्ट्रवादीचे सतीश पवार (९००), शरद लाड (९००), काँग्रेसचे विक्रम सावंत (१००० मते) विजयी झाले. या गटात फारशी चुरसही नव्हती.महिला गटातील सात जागांसाठी मात्र प्रचंड चुरस होती. मतदानावेळी दिसलेल्या गटबाजीचा परिणाम निकालामध्ये जाणवला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एकमेव सदस्य असून, त्यांनी काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांच्या गटाच्या विशाल चौगुले आणि मनीषा पाटील यांना सोबत घेतले. त्यांनी भाजप, काँग्रेस आणि राष्टÑवादीच्या सदस्यांशीही संपर्क साधला होता. स्वाभिमानीच्या उमेदवाराला एक मत अथवा दुसºया क्रमांकाचा पसंतीक्रम देण्याची विनंती खुद्द खा. राजू शेट्टी यांनी काही सदस्यांना केली होती. शेट्टी आणि विशाल पाटील यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. ‘स्वाभिमानी’कडे तीन मते असताना भाजप, काँग्रेस आणि राष्टÑवादी आघाडीची मते फोडण्याची खेळी यशस्वी ठरली. संयुक्त आघाडीतील तीन मते आडमुठे यांना मिळाल्याने त्या विजयी झाल्या. संयुक्त आघाडीच्या सुरेखा जाधव (रयत विकास आघाडी) यांना आठ मतांच्या कोट्यापैकी केवळ पाच मते मिळाली. त्यांच्या कोट्यातील तीन मते आडमुठे यांना मिळाल्याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.रयत विकास आघाडीच्या सुरेखा जाधव यांना आठ मतांचा कोटा देण्यात आला होता. जाधव स्वत:, अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, सुनीता पवार (भाजप), चंद्रकांत पाटील, संजय पाटील, संजीव पाटील, आशा झिमूर (चौघे राष्टÑवादी) आणि संभाजी कचरे (राष्टÑवादी बंडखोर) यांचा समावेश होता. परंतु, आठपैकी जाधव यांना केवळ पाच मते मिळाली. उर्वरित तीन मते त्यांना मिळाली नाहीत. बाहेर गेलेल्या तीन मतांमुळे जाधव यांना पराभवास सामोरे जावे लागले, तर स्वाभिमानीच्या आडमुठे यांनी राष्टÑवादीच्या मदतीने बाजी मारली.सर्वसाधारण महिला गटातील सात जागांसाठी अकरा उमेदवार होते. त्यापैकी तीन महिलांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे शिल्लक राहिले होते. महिला गटातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवार सुरेखा आडमुठे यांनी धक्कादायक बाजी मारली.जिरवाजिरवीत कार्यकर्त्यांचा बळीखा. राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील संघर्षात कामेरी (ता. वाळवा) जिल्हा परिषद गटातील सुरेखा जाधव यांचा बळी गेला. खोत समर्थक सुरेखा जाधव यांना पाडण्याच्या घडामोडी वेगाने झाल्या. खोतविरोधक राष्ट्रवादीच्या मतदारांशी शेट्टी यांनी संपर्क साधून, ती मते सुरेखा आडमुठे (कवठेपिरान) यांच्याकडे वळविली गेली.
‘स्वाभिमानी’चा संयुक्त आघाडीला दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2017 11:57 PM