सांगली : महापालिका निवडणुका जवळ येत असल्याने पक्षीय राजकारणाचा रंग आता गडद होत चालला आहे. रविवारी भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराच्या संयोजनात राष्टÑवादी आणि कॉँग्रेसच्या सहा नगरसेवक व त्यांच्या नातलगांनी सहभाग घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.गणेशनगर रोटरी हॉलमध्ये रविवारी सकाळी या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक विक्रम पाटील-सावर्डेकर व त्यांच्या सहकाºयांनी केले होते. या कार्यक्रमास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार आदी उपस्थित होते. याठिकाणी महाआरोग्य शिबिरासाठी राष्टÑवादीचे महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांनी मोठे सहकार्य केले. त्यामुळे कार्यक्रमात महसूलमंत्र्यांच्याहस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला. त्याचबरोबर राष्टÑवादीच्या नगरसेविका स्नेहल सावंत, नगरसेविका प्रियंका बंडगर यांचे पती सुरेश बंडगर, नगरसेविका कांचन भंडारे यांचा मुलगा रोहन भंडारे, प्रार्थना मद्भावीकर यांचे पती प्रसाद मदभावीकर आणि कॉँग्रेसचे माजी सभापती बाळासाहेब काकडे आदींचा सहभाग होता.एकूण भाजपच्या कार्यक्रमात त्यांचा हा सहभाग उठून दिसण्यासारखाच होता. राष्टÑवादीच्या नगरसेवक व त्यांच्या नातलगांची गर्दी अधिक दिसत होती. पक्षीय प्रवेशाबाबतची चर्चाही कार्यक्रमात रंगली. चंद्रकांतदादांचा सत्कार स्वीकारण्यास आलेल्या दिग्विजय सूर्यवंशी यांच्या प्रवेशाबाबतचा मुद्दा आ. सुधीरदादांनी छेडला. चंद्रकांतदादांनीही त्यावर दिग्विजय सूर्यवंशींना याबाबत हरकत नसावी, असे मत मांडले. ‘त्यांची तयारी असेल तर आता छोटा आणि नंतर मोठा सत्कार करता येईल’, अशी घोषणा करताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात या गोष्टीस दाद दिली. संजयकाकांनी मात्र हे सर्व लोक मित्रपे्रमापोटी आल्याचे सांगितले. प्रत्यक्षात त्यांचा एकूणच सहभाग पक्षीय कार्यकर्त्यांसारखाच दिसून येत होता. बाळासाहेब काकडे हे कॉँग्रेसचे नगरसेवक आहेत. त्यांचीही उपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. राजकीय गोटात यामुळे खळबळ माजली.केक कापला : महापालिका प्रतिमेचासंजयकाका पाटील आणि विक्रम पाटील-सावर्डेकर यांच्यासाठी दोन स्वतंत्र केक आणण्यात आले होते. संजयकाकांसाठी खास महापालिकेची प्रतिमा असलेला केक तयार करण्यात आला होता. तो संजयकाकांना कापण्यास सांगून महापालिका निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढविण्याचे संकेत देण्यात आले.नेत्यांची सावध पावलेमहापालिका क्षेत्रातील निवडणुका लढविण्यासाठी भाजपने गेल्या महिन्याभरापासून तयारी सुरू केली आहे. अन्यपक्षीय दिग्गज नगरसेवकांना त्यांनी गळ टाकला आहे. यातील बरेच नगरसेवक त्यांच्या गळाला लागण्याची चिन्हेही दिसत आहेत. मात्र जुन्या आणि नव्या लोकांच्या उमेदवारीचा पेचप्रसंग त्यांच्यासमोर निर्माण होऊ शकतो. याचाच विचार करून जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी सावध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
भाजपच्या मांडवात अन्यपक्षीय नगरसेवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 11:59 PM