शुक्रवारी मिरज पंचायत समितीचे उपसभापती अनिल आमटवणे व गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांनी गळतीची पहाणी केली. रेल्वे रूळाखालून विनापरवाना जलवाहिनी टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच उपसभापतींनी योजनेच्या तांत्रिक सल्लागारास धारेवर धरले.
टाकळी येथे २०१२ मध्ये टाकळी- बोलवाड- सुभाषनगरसाठी भारत निर्माण योजनेचे काम पूर्ण झाले. या योजनेची मुख्य जलवाहिनी मिरज- पंढरपूर रेल्वे मार्गावरील बेडगच्या रस्त्याच्या रेल्वे पुलालगत रूळाखालून टाकली आहे. सध्या या जलवाहिनीला गळती लागली आहे. मुख्य ठेकेदार अशोक जाधव यांच्यासह अन्य दोन सब ठेकेदारांनी रितसर परवानगी न घेता योजनेची जलवाहिनी रेल्वे रुळाखालून टाकल्याने जलवाहिनीची गळती काढण्यास रेल्वे प्रशासनाने नकार दिला आहे.
या ठिकाणी पंचायत समितीचे उपसभापती अनिल आमटवणे, गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर, विस्तार अधिकारी आर. एल. गुरव यांनी भेट देऊन पाहणी केली. सरपंच महेश मोहिते, ग्रामपंचायत सदस्य सुनील गुळवणे, माजी सदस्य सुलेमान मुजावर, मनोज नांद्रेकर, सचिन पाटील, स्वराज्य पाटील, महादेव गुरव यांच्याशी चर्चा करून योजनेची माहिती घेतली.
चौकट
सोमवारपर्यंत मुदत
उपसभापती अनिल आमटवणे यांनी योजनेचे तांत्रिक सल्लागार जोशी यांना तुम्ही रीतसर पैसे भरून परवानगी घेऊन जलवाहिनी का टाकली नाही असा जाब विचारत फैलावर घेतले. सोमवारपर्यंत ठेकेदारांकडून जलवाहिनीचा विषय न सोडविल्यास ग्रामस्थांना बरोबर घेऊन ठेकेदारांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला.
चौकट
नव्याने परवानगी घ्यावी लागणार
जलवाहिनीच्या गळतीने मिरज-पंढरपूर मार्गाच्या रेल्वे भरावाला धोका निर्माण झाल्याने पाणीपुरवठा बंद करण्याबरोबर नव्याने परवानगी घेऊन जलवाहिनी टाकण्याची सूचना रेल्वे प्रशासनाने ग्रामपंचायतीला केली आहे.