मुंबई - राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असताना कोरोनाचे निर्बंध शिथिल होणार का? असा प्रश्न आता प्रत्येकजण विचारत आहे. या संदर्भात आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकप्रकारे घोषणाच केली आहे. राज्यातील दुकानांना रात्री 8 वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मात्र, त्यासोबतच, ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या जास्त आहे, तिथं तेच नियम लागू राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीसांगली येथील पत्रकार परिषदेत कोरोनाचं संकट अद्याप आहेच. त्यामुळे, पूरग्रस्त भागात आपण आणखी टेस्ट वाढविणार आहोत, डॉक्टरांचे कॅम्प लावणार आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यावेळी, दुकानाच्या वेळा वाढवून द्या, अन्यथा दुकाने उघडू असा व्यापाऱ्यांनी इशारा दिला आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आलो होता. त्यावरही मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच उत्तर दिलं.
अशा धमक्यांना मी मनावर घेत नाही. कारण, माझ्यासमोर माझ्या नागरिकांच्या जीवाची चिंता आहे. जीव वाचविण्यासाठी जेव्हा धावपळ करावी लागते. राज्यात 1250 ते 1300 मेट्रीक टन ऑक्सिजन आपण उत्पादीत करू शकतो. जेव्हा दुसऱ्या लाटेत पीक गाठलं होतं, तेव्हा 1700 मेट्रीक टन ऑक्सिजन लागत होता. म्हणजे, 500 मेट्रीक टन ऑक्सिजन आपल्याला लागत होता. हे आणणं खूप कठीण होतं, इथे कोणी मदतीला येत नाही. मी व्यापाऱ्यांच दु:ख, वेदना समजू शकतो, पण त्यावेळेला कुठलंही ऑक्सिजनचं दुकान उघडं नव्हतं. म्हणून मला ही काळजी घ्यावी लागते. नागरिकांचे जीव वाचवणं हे महत्त्वाच आहे, त्यामुळे मला ही काळजी घ्यावी लागते. पुढच्या लाटेत दुसऱ्या लाटेपेक्षा दुप्पटीने ऑक्सिजन लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे, कोविड नियमांचं पालन बंधनकारक आहे. आज आपण एक आदेश काढत आहोत, दुकानाच्या वेळा रात्री 8 पर्यंत करणार आहोत. मात्र, ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होत नाही, तिथं रुग्णसंख्या जास्त आहे, तिथं पूर्वीचेच नियम व बंधन लागू राहतील, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्रीच निर्णय घेतील - वडेट्टीवार
राज्यात सातत्याने सक्रिय रुग्णांमध्ये घट होताना दिसते आहे. सध्या ७६ हजार ७५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे राज्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याची माहिती समोर आली होती. परंतु निर्बंध शिथिल करण्याबाबत मंत्रिमंडळात एकमत झालेलं नाही, असं मंत्री विजय वडेट्टीवर यांनी सांगितलं आहे. कोरोना अद्याप संपलेला नाही. ऑगस्टच्या शेवटपर्यंत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करण्याबाबत मंत्रिमंडळात एकमत झालेलं नाही. फक्त चर्चा झाली, असं सांगतानाच टास्क फोर्सशी चर्चा करूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्बंध शिथिल करण्याबाबत अंतिम निर्णय घेतील, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.