लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शिराळा तालुक्यातील एका गावातील ८ वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या एकास येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे पहिले जिल्हा न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी अनैसर्गिक कृत्य आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली प्रत्येकी १० वर्षांचा सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या दोन्ही शिक्षा त्याला एकत्रितपणे भोगाव्या लागणार आहेत. दंड न दिल्यास १ महिना साधा कारावास भोगावा लागणार आहे. अरुण ऊर्फ बाबू सुनील जमदाडे (वय २०, सोनवडे, ता. शिराळा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यात जामिनावर असतानाही त्याने तालुक्यातीलच एका गावातील एका महिलेवर बलात्कार केला होता. त्याचा स्वतंत्र गुन्हा नोंद आहे. त्याच्या या विकृत प्रवृत्तीला हा आठ वर्षांचा मुलगाही बळी पडला.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी, यातील पीडित मुलगा हा इयत्ता दुसरीमध्ये शिकत होता. ७ फेब्रुवारी २०१८ राेजी तो सायंकाळी ५ वाजता शाळेतून घरी आला. घरी दप्तर ठेवून तो मित्रांसमवेत खेळण्यासाठी घरापासून बाजूला गेला होता. जमदाडे याने खेळत असलेल्या पीडित मुलास एका घराच्या पाठीमागे नेले. तेथे त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. या प्रकाराने घाबरलेला मुलगा घरी आला. त्याने त्याच्याशी झालेला प्रकार आईला सांगितला. त्यावर आईने पोलिसात त्याच्याविरुद्ध फिर्याद दिली. या खटल्यात सरकारी वकील रणजित पाटील यांनी आपल्या युक्तिवादात, आरोपीचे कृत्य हे मानवी जीवनाला काळिमा फासणारे आहे. तो विकृत प्रवृत्तीचा आहे. जामिनावर असतानाही त्याने एका महिलेवर बलात्कार केला आहे. त्यामुळे अशा विकृतीस आणि लहान मुलांवरील अत्याचाराला पायबंद बसावा म्हणून आरोपीस कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. न्यायालयाने पीडित मुलगा, फिर्यादी आई, वैद्यकीय अधिकारी आणि तपास अंमलदार यांच्या साक्षी ग्राह्य मानत जमदाडे याला शिक्षा सुनावली. सरकार पक्षाला सहायक फौजदार चंद्रकांत शितोळे, हवालदार पी. जी. आपटे यांनी सहकार्य केले.