सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक तर उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर दोन्ही नेत्यांच्या समर्थकांसह पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगलीत एकच जल्लोष केला.जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी निळकंठ करे यांनी अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया राबविली. बँकेत एकूण १७ जागांसह महाविकास आघाडी सत्तेत आली आहे. विरोधी भाजपकडे चारच संचालक असल्याने त्यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला.
मावळते अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी मानसिंगराव नाईक यांचे नाव अध्यक्षपदासाठी सूचविले. शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी त्यास अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी जयश्रीताई पाटील यांचे नाव मावळते उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी सुचविले. त्यास पृथ्वीराज पाटील यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.बँकेची निवडणूक गेल्या आठवड्यात पार पडली. महाआघाडीचे १७ तर भाजपचे ४ उमेदवार निवडून आले आहेत. निवडणुकीसाठी महाविकास आघाडी करताना काँग्रेसने अध्यक्षपदावर दावा सांगितला होता. मात्र सर्वाधिक संचालक राष्ट्रवादीचे निवडून आले आहेत. त्यामुळे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच राहिले. दोन्ही नेत्यांच्या निवडीनंतर त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. निवडीनंतर मावळत्या पदाधिकाऱ्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.काँग्रेसलाही अध्यक्षपदाची संधीराष्ट्रवादीला पुढील तीन वर्षासाठी अध्यक्षपद देण्यात आले असून त्यानंतरची शेवटची दोन वर्षे काँग्रेसला संधी दिली जाणार आहे. याबाबत नेत्यांच्या बैठकीत निर्णय झाल्याचे सांगण्यात येत आहे. या काळात शिवसेनेलाही एक किंवा दोन वर्षासाठी उपाध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे.