लाेकमत न्यूज नेटवर्क
आळसंद : खानापूर तालुक्यातील तांदळगाव ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यात अखेर स्थानिक नेत्यांना यश आले आहे. सात सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सातच अर्ज दाखल झाले असून सातही अर्ज वैध झाले आहेत. त्यामुळे १९५८ साली स्थापन झालेल्या ग्रामपंचायतीच्या ६२ वर्षांच्या इतिहासात प्रथमच निवडणूक बिनविरोध हाेत असून आता केवळ औपचारिक घाेषणा बाकी आहे.
खानापूर तालुक्यातील तांदळगावमध्ये राजकीय संघर्ष नेहमीच टाेकाचा राहिला आहे. या गावाने निवडणूक बिनविरोध करून नववर्षाची गुड न्यूज दिल्याची चर्चा तालुक्यात होत आहे. तांदळगावात आमदार अनिल बाबर व माजी आमदार सदाशिवराव पाटील समर्थकांचे दोन गट आहेत. या दोन्ही गटांतील राजकीय संघर्ष संपूर्ण तालुक्याने अनुभवला आहे. त्यामुळे गावातील वातावरण बिघडून त्याचा विकासकामांवर परिणाम होत होता. ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजताच दोन्ही गटातून इच्छुकांची भाऊगर्दी वाढल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढली होती.
त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रकांत चव्हाण यांनी विरोधी गटापुढे बिनविरोधचा प्रस्ताव मांडला. चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. त्यानुसार बाबर गटाला चार व पाटील गटाला तीन असे सात अर्ज दाखल करण्यात करून कुरघोडीचे राजकारण टाळून गावाचा विकास अधिक वेगाने करण्याचा निश्चय दोन्ही गटांनी व ग्रामस्थांनी केला. त्यामुळे गावात समाधानाचे वातावरण आहे.
चौकट :
राजकारणातील २५ वर्षे संघर्षात गेली. या काळात विरोधक म्हणून एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी हाेता येईना. बिनविरोधामुळे संघर्ष टाळून गावाचा विकास करणं सोपं होईल.
- चंद्रकांत चव्हाण
सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, विटा
चौकट
गटातटांच्या राजकारणामुळे गावातील वातावरण बिघडून गेलं होतं. तरुणाई भरकटत निघाली होती. त्यामुळे दोन्ही गटांनी एकत्र येऊन ग्रामस्थांच्या सहकार्याने निवडणूक बिनविरोध केली.
- आनंदा चव्हाण, माजी सरपंच
फोटो : ग्रामपंचायत इमारतीचा फोटो