सांगली : लॉकडाऊननंतर खासगी प्रवासी वाहतूक जोमात चालू असताना, एसटीलाच घरघर का लागली आहे, असा सवाल चक्क एसटी कर्मचारीच उपस्थित करू लागले आहेत. आजही जिल्ह्यातील बसेसच्या ५० टक्के फेऱ्या बंद असल्यामुळे अनेक चालक व वाहकांना बिनपगारी सक्तीची रजा घ्यावी लागत असल्यामुळे त्यांच्या संसाराचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
जिल्ह्यात एक हजार ३७२ चालक आणि एक हजार २६८ वाहकांची संख्या आहे. ७६० बसेसच्या दररोज चार हजार ५२९ फेऱ्या होत होत्या. कोरोनामुळे लॉकडाऊन करावे लागल्यामुळे सर्वच वाहतूक चार महिने बंद होती. सध्या एसटीची वाहतूक सुरू झाली आहे. पण, प्रवाशांची संख्या कमी असल्यामुळे ५० टक्केच बसफेऱ्या जिल्ह्यात चालू आहेत. यामुळे शंभर ते दीडशे चालक व वाहकांना रोज सक्तीने रजेवर जावे लागत आहे. अनेक कर्मचाऱ्यांच्या रजा संपल्यामुळे त्यांची बिनपगारी रजा होत असल्यामुळे ५० टक्के पगारही कर्मचाऱ्यांच्या हातात मिळत नाही. नवीन चालक, वाहकांची मोठी आर्थिक कोंडी झाली असून, याकडे एसटी प्रशासन गांभीर्याने कधी लक्ष देणार, असा सवाल कर्मचारी संघटनांमधून होत आहे.
चौकट
चाळीस टक्के चालक, वाहकांना सक्तीची सुटी
कोरोनामध्ये एसटीच्या थांबलेल्या फेऱ्या आजही ५० टक्के बंदच आहेत. या फेऱ्या चालू करण्याबाबत अधिकाऱ्यांकडून फारसे गांभीर्याने प्रयत्न होत नसल्यामुळे ४० टक्के चालक, वाहकांची काम करण्याची इच्छा असतानाही सक्तीने रजेवर जावे लागत आहे, असा आरोप कर्मचारी संघटनांमधून होत आहे. तरीही प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याबद्दलही कर्मचारी नाराज आहेत.
चौकट
जिल्ह्याचे बसचे उत्पन्न २६ टक्के घटलेलेच
लॉकडाऊननंतर एसटी बहुतांशी मार्गावर धावत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे प्रवासी मात्र फारसा एसटीकडे आकर्षित झालेला दिसत नाही. यामुळे एसटीच्या फेऱ्या रिकाम्याच धावत असल्यामुळे उत्पन्नात मात्र फारशी वाढ दिसत नाही. प्रशासनाच्या माहितीनुसार, २६ टक्के उत्पन्न घटलेले आहे. उत्पन्न वाढीचे प्रयत्न सुरु आहेत.
कोट
चालक आणि वाहकांना पगार अत्यंत कमी आहे. नवीन कर्मचाऱ्यांची तर आर्थिक परिस्थिती खूपच वाईट आहे. तरीही प्रशासनाकडून चालक आणि वाहकांना सक्तीने रजा घ्यावी लागत आहे. या कर्मचाऱ्यांना कौटुंबिक खर्च भागविणेही खूप कठीण झाले आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
- विलास यादव,
राज्य चिटणीस, महाराष्ट्र एस. टी. कामगार सेना.
कोट
कोरोनाच्या संकटामुळे एसटीचे उत्पन्न कमी झाले आहे. प्रवासीही एसटीकडे फारसे येत नव्हते. सध्या यामध्ये खूप बदल झाला असून, लांब पल्ल्याच्या बसेसची वाहतूक मोठ्याप्रमाणात वाढविली आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार बसेसची सेवा दिली आहे. बसेसच्या फेऱ्या वाढतील, तसे सर्वच चालक-वाहकांना नियमित काम दिले जाणार आहे.
- आलम देसाई,
विभागीय वाहतूक अधिकारी, सांगली.