सांगली : जिल्ह्याला गारपीट, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने बुधवारी दुपारी चांगलेच झोडपले. यामुळे आंबे जमीनदोस्त झाले आहेत. दुपारी ढगाळ वातावरण निर्माण होऊन साडेचार वाजता जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. अनेक झाडे उन्मळून पडली होती. खानापूर, मिरज तालुक्यात तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.सांगली, मिरज शहरांसह परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वारा आणि विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडला. गेल्या दोन दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. बुधवारी दुपारनंतर अचानक वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह धुवाॅंधार पाऊस पडला. त्यामुळे शहरातल्या अनेक सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचले होते. पावसामुळे तापमानाचा पारा खाली आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.नरवाड (ता. मिरज) येथे वादळी पावसाने हजेरी लावली. शेतातील उभी पिके पाणी देऊनही कोमेजू लागली असताना वळीव पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. हा पाऊस पानमळा पिकाला जीवदान देणारा आहे. द्राक्षबागांची खरडछाटणी झालेल्या बागांना पोषक ठरणार आहे. पावसाअभावी शेतीच्या खोळंबलेल्या मशागती पुन्हा सुरू होणार आहेत.खानापूर पूर्व भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला असून मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली आहे.
गारपीट, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने सांगली जिल्ह्याला झोडपले- video
By अशोक डोंबाळे | Published: April 17, 2024 5:56 PM