दत्ता पाटीलतासगाव : गेल्या चार दिवसांपासून सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ७० टक्के द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. ८० हजार एकर क्षेत्रापैकी, ५६ हजार एकरहून अधिक द्राक्षबागांचा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल झाला आहे. फुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागांत घडकूज आणि मणी गळ मोठ्या प्रमाणात झाली आहे. मऊ पडू लागलेल्या द्राक्षबागांतील द्राक्षांना तडे गेले आहेत. द्राक्ष बागांच्या नुकसानीचे हे सलग तिसरे वर्ष आहे. या नुकसानीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी कोलमडून गेला आहे.जिल्ह्यात ८० हजार एकर द्राक्ष बागेचे क्षेत्र आहे. दोन वर्षांपासून अवकाळीमुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे टंचाईचे सावट असताना देखील शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने द्राक्षबागा फुलवण्यासाठी जिवाचे रान केले. यावर्षी हंगाम चांगला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच, गेल्या आठवडाभरातील खराब हवामान आणि अवकाळी पावसाच्या अवकृपेमुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेला.विशेषता तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. सप्टेंबरपूर्वी आगाप फळ छाटणी घेतलेल्या द्राक्षबागेत अवकाळी पावसामुळे द्राक्ष मण्यांना मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. निर्यातक्षम द्राक्ष तयार झालेली असताना देखील, या द्राक्षांचा चिखल झाला आहे.फुलोरा अवस्थेत असलेल्या द्राक्षबागात अवकाळी पावसामुळे घडकूज आणि मणीगळ मोठ्या प्रमाणात झाली आहे. फुलोरा अवस्थेतील बागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. उर्वरित द्राक्षबागादेखील खराब हवामानामुळे डाउनी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.जिल्ह्यातील चाळीस हजार एकरहून अधिक क्षेत्राला अवकाळीचा फटका बसला आहे. नुकसानीत सापडलेल्या द्राक्षबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. लाखो रुपयांचा खर्च करून द्राक्षबागा पिकवण्यासाठी धडपड करणाऱ्या द्राक्ष उत्पादक शेतकरी सलग तिसऱ्या वर्षी नुकसानीमुळे कर्जाच्या खाईत गेला आहे.
तालुकानिहाय द्राक्षक्षेत्र (हेक्टरमध्ये) -
- खानापूर : १,१२५
- क. महांकाळ : २,८७१
- कडेगाव : २२९
- पलूस : १,५६१
- तासगाव : ९.२३६
- मिरज : ८२६८
- जत : ६,९०६
- वाळवा : १,२१५
- आटपाडी : ३६५
- - एकूण : ३१,७७६
जिल्ह्यात पाऊस पडलेल्या ठिकाणी द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष बागांच्या झालेल्या नुकसानीचे नजर अंदाज सर्वेक्षण सुरू झाले आहे. झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. - विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
आठवडाभरापासून हवामान खराब आहे. फुलोरावस्थेतील द्राक्षबागांना सद्य:स्थितीत घडकूज, मणीगळ होऊ नये, यासाठी कोणतेच उपाय नाहीत. छाटणीनंतर पंधरा दिवसांनी गतिरोधक औषधांची फवारणी केली असल्यास नुकसान कमी होऊ शकते. सद्य:स्थितीत शास्त्रज्ञ, तज्ज्ञांचा सल्ला घेऊन औषध फवारणी करावी. जिल्ह्यातील ७० टक्के द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. - सुभाष आर्वे, माजी अध्यक्ष, राज्य द्राक्षबागायतदार संघ.