उमेश जाधवकामेरी : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गापासून पूर्वेला ४ किलोमीटर अंतरावर येडेनिपाणी गाव आहे. गावानजीक असणाऱ्या डोंगररांगेत विलासगड नावाचा किल्ला आहे. डोंगरावर श्री मल्लिकार्जुन मंदिर आहे. मंदिरासमोर बांधलेल्या तटबंदीनजीक नगारखान्याच्या भिंतीवर एक शिलालेख बसवलेला आहे. या शिलालेखामधून मंदिरासंदर्भातील बांधकामाची माहिती उपलब्ध झाली आहे. शिलालेखाचे वाचन इतिहास अभ्यासक अतुल मुळीक यांनी केले.विलासगड किल्ल्याचा उल्लेख छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या कालखंडात आढळून येतो. मल्लिकार्जुन मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून हजारो भाविक येत असतात. अगस्ती ऋषींनी हे तीर्थक्षेत्र वसविल्याचा तसेच पत्नी लोपामुद्रा यांच्यासह अगस्ती ऋषी येथे वास्तव्याला असल्याचा उल्लेख पुरातन ग्रंथामध्ये आढळत असल्याचे स्थानिक लोकांकडून सांगितले जाते.
श्री क्षेत्र मल्लिकार्जुन येथील शिलालेख आयताकृती असून, १६ इंच लांबी असलेला आडवा, तर १३ इंच उभा आहे. हा शिलालेख तटबंदीनजीक डाव्या बाजूस असणाऱ्या नगारखान्याच्या भिंतीवर गोमुखाच्या वरील बाजूस बसविण्यात आला आहे. अक्षरे कोरीव स्वरूपात असून, एकूण ५ ओळींचा देवनागरी लिपीतील आहेत.या शिलालेखावर ‘श्री सळी श्री सळी मलकजिन [भिंत्तीं]च जोर्नउधार जा-हाला धारापा बीन आ-म [ना]चा पुत्र वीबुत्या’ असा उल्लेख आहे. त्याचा आशय : मल्लिकार्जुन देवाच्या मंदिराच्या भिंतींच्या जीर्णोद्धाराचे काम धारापा वडील आमना यांचा पुत्र वीबुत्या (विभूत्या) याने केला. म्हणजेच विबुत्याने केला, असा होतो असे मुळीक यांनी सांगितले.
याचे सविस्तर विश्लेषण : मल्लिकार्जुन देवाच्या मंदिराच्या भिंतींच्या जीर्णोद्धाराचे काम धारापा वडील आमना यांचा पुत्र वीबुत्या (विभूत्या) याने केला. म्हणजेच विबुत्याने केला. विबुत्याचे वडील धारापा त्याचे वडील आमना होत. तीन पिढ्यांतील व्यक्तींची नावे आली असून, मंदिराच्या बाबतीतील हा महत्त्वाचा शिलालेख आहे.या शिलालेखात तिथीचा उल्लेख आला नाही, मात्र अक्षरपद्धतीवरून हा शिलालेख जवळपास ३०० वर्षं जुना असावा, अशी माहिती इतिहास अभ्यासक अतुल मुळीक यांनी दिली. शिलालेख वाचन करण्यासाठी इतिहास अभ्यासक कृष्णा गुडदे, अनिल दुधाने यांच्यासह विक्रम पाटील, श्री क्षेत्र मल्लिकार्जुन देवस्थान सेवाभावी मंडळाचे अध्यक्ष गोरखनाथ गुरव यांचे सहकार्य मिळाले.