महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून सबंध महाराष्ट्र आमदार शिवाजीराव देशमुख यांच्याकडे पाहतो. घरामध्ये कसलाही राजकीय वारसा नव्हता. तरीही त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात अधिराज्य गाजविले. वसंतदादा पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून महाराष्ट्रात त्यांची ओळख आहे. घरची परिस्थिती हलाकीची असतानाही पदवीपर्यंत शिक्षण घेतले. शिक्षणानंतर त्यांनी नोकरी करण्याचा मनोदय केला. पंचायत समिती तासगाव येथील कृषी विभागात नोकरीस सुरुवात केली.
दरम्यानच्या काळामध्ये कामाच्या निमित्ताने त्यांचा वारंवार वसंतदादा पाटील यांच्याशी संवाद होत होता. त्यांची जवळीक वाढत गेली. दादांनीच देशमुख यांना राजकारणात येण्याचा आग्रह धरला. १९६८ ला कोयना भूकंपाच्यावेळी देशमुख यांनी मोठ्या प्रमाणात लोकांना मदत केली. देशमुख यांची मोठ्या प्रमाणात लोकप्रियता होती. त्यातूनच त्यांची जिल्हा परिषदेला बिनविरोध निवड झाली.
१९७८ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. प्रचंड रस्सीखेच झाली. देशमुख यांच्याबदल संपूर्ण पोषक वातावरण होते. लोकांचे प्रचंड पाठबळ त्यांना मिळाले. १९७८ ला उमेदवारी काँग्रेसने नाकारली होती. त्यानंतर लोकांच्या आग्रहाखातर त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयश्री खेचून आणली. अपक्ष म्हणून निवडणूक जिंकल्यानंतर देशमुख यांना पाहण्यासाठी मुंबई विधानभवनमध्ये प्रचंड गर्दी केली होती. देशमुख यांनी वसंतदादांची भेट घेऊन काँग्रेस पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिला होता.
शिराळा तालुका डोंगरी व दुर्मिळ भाग असल्याने विकासाबाबत हा मतदारसंघ खूप मागे होता. विकासात्मक प्रगती साधण्यासाठी देशमुख यांनी पहिल्यापासून प्रयत्न केले. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांच्या उपस्थितीत पहिल्यांदा डोंगरी परिषद शिराळा येथे भरवली. या परिषदेमध्ये शिराळा तालुका संपूर्ण डोंगरी तालुका म्हणून घोषणा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी केली. त्यांचा मोठा फायदा आजही लोकांना होत आहे. १९८३ ला वैद्यकीय शिक्षणासाठी गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी सोय व्हावी, यासाठी खासगी महाविद्यालयाच्या निर्मितीसाठी शासनाकडून मान्यता मिळवून घेतली.
राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये पाटबंधारे, राज्यमंत्री, परिवहनमंत्री, गृहमंत्री म्हणून मोठे काम त्यांनी केले. गृहमंत्री असताना ‘भिवंडी’ येथे दोन समाजात जातीय दंगल घडली होती. त्यावेळी देशमुख यांनी स्वत: त्याठिकाणी जाऊन ही दंगल शांत केली होती. देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांचे विशेष कौतुक करून सन्मान केला होता.
गृहमंत्री असताना क्रीडा क्षेत्रात खेळणाऱ्या खेळाडूंना पोलीस दलात भरतीसाठी विशेष सवलत सुरु केली होती. देशमुख यांनी शिराळा मतदारसंघातील व त्यांच्या संबंधित युवकांना पोलीस दलात मोठ्या प्रमाणात नोकरीस लावले होते. एका एका गावात २० ते ३० युवक पोलीस दलात भरती केले. राज्याचे पुनर्वसनमंत्री असताना पुनर्वसित बाधित कुटुंबातील मुलांना शासकीय नोकरीत २ टक्के राखीव जागा ठेवल्या गेल्या. कृषिमंत्री म्हणून त्यांनी खूप प्रभावी काम केले होते.
शेतकºयांना १०० टक्के अनुदानाची योजना सुरु केली. सहकारमंत्री म्हणून सर्वसामान्य गोरगरीब, कष्टकरी लोकांची सामाजिक व आर्थिक पत वाढविण्यासाठी पतसंस्थांची निर्मिती केली.१९९२ मध्ये त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळविले होते. त्यानंतर सलग ५ वेळा विधानपरिषद सदस्य म्हणून, तर काँग्रेसकडून त्यांची बिनविरोध ४ वेळा विधानपरिषद सभापती म्हणून निवड झाली.