सांगली : माधवनगर रस्त्यावरील मदनभाऊ पाटील यांच्या स्मारकस्थळी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण २ डिसेंबर रोजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्याहस्ते करण्यात येणार असल्याची माहिती महापौर हारूण शिकलगार यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत दिली. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, डॉ. पतंगराव कदम, आ. जयंत पाटील, खासदार संजयकाका पाटील, खा. राजू शेट्टी यांच्यासह सर्वपक्षीय नेतेमंडळी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, महापालिकेच्यावतीने माधवनगर रस्त्यावरील टीव्हीएस शोरूमसमोरील खुल्या भूखंडावर मदनभाऊ पाटील यांच्या स्मारकाचे काम सुरू केले आहे. या स्मारकाच्या कुंपणाचे काम पूर्ण झाले आहे. स्मारकात आर्ट गॅलरी, लॉन आदी करण्यात येणार आहे. मदनभाऊंचा नऊफुटी पूर्णाकृती पुतळा मिरजेतील प्रसिध्द शिल्पकार विजय गुजर यांनी तयार केला आहे. चबुतºयाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मदनभाऊ पाटील यांची जयंती २ डिसेंबरला आहे. या दिवशी दुपारी बारा वाजता त्यांच्या पुतळ्याचे अनावरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याहस्ते, तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांंच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
या कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, राष्ट्रवादीचे माजी मंत्री आ. जयंत पाटील, विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख, खासदार संजयकाका पाटील, खासदार राजू शेट्टी, आमदार अनिल बाबर, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुमनताई पाटील, आ. सुरेश खाडे, आ. विलासराव जगताप, आ. शिवाजीराव नाईक, माजी आमदार विलासराव शिंदे आदी सर्वपक्षीय मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्मारकाच्या बाजूचे रस्ते आमदार गाडगीळ यांच्या फंडातून मंजूर आहेत. त्यामुळे या रस्त्यांची कामे होण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली आहे. लवकरच ही कामे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी गटनेते किशोर जामदार, स्थायी समितीचे माजी सभापती संतोष पाटील, नगरसेवक राजेश नाईक, प्रभाग समिती एकचे सभापती पांडुरंग भिसे, गजानन मगदूम, विष्णू माने आदी उपस्थित होते.