लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेत पदाधिकारी व प्रशासन ही रथाची दोन चाके आहेत. त्यामुळे ती एकाच दिशेने व समन्वयाने चालली पाहिजेत. ती विरुद्ध दिशेने गेली, तर अपघात होईल, अशा शब्दात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाची भर बैठकीत कानउघाडणी केली.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम तसेच नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महापालिकेत आढावा बैठक घेतली. वसंतदादा पाटील सभागृहात झालेल्या या बैठकीस पालकमंत्री जयंत पाटील, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार अनिल बाबर, महापौर गीता सुतार, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, नगरविकास विभागाने राज्यासाठी एकत्रित विकास नियंत्रण नियमावली आणली आहे. तसेच २०२० पर्यंतची गुंठेवारी नियमित करण्याचाही निर्णय घेतला आहे.
महापालिकेचा विकास आराखडा मंजूर झाला आहे. इ.पी.चा प्रस्ताव माझ्याकडे आला, तर तो लगेच मंजूर करून देऊ. याशिवाय बेघरांसाठी घराचा निर्णय, मिरज दर्गा विकास आराखडा, आपत्ती व्यवस्थापन सक्षम करणे यासाठी संबंधित विभागाकडे नगरविकास विभाग पाठपुरावा करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
घनकचरा व्यवस्थापनाबाबत आयुक्तांनी स्थायी समितीचा ठराव विखंडितसाठी पाठवला आहे. त्यावर मंत्री शिंदे म्हणाले, घनकचरा व्यवस्थापनाबाबत नगरविकास विभाग योग्य तो निर्णय घेईल.
जयंत पाटील म्हणाले, काळया खणीच्या सुशोभिकरणाचा प्रश्न प्रलंबित आहे. केंद्राच्या मान्यतेसाठी त्याचा प्रस्ताव गेला आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. सांगली आणि मिरज या दोन शहरांना जोडणारा रस्ता सहापदरी करण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
आयुक्त नितीन कापडणीस यांनी यावेळी महापालिकेच्यावतीने सुरू असलेल्या योजनांची माहिती दिली. महापौर गीता सुतार म्हणाल्या, महापालिकेचे बजेट शासन निधीवर अवलंबून आहे. त्यामुळे एलबीटी अनुदानात वाढ करावी. खासदार संजयकाका पाटील म्हणाले, महापालिका क्षेत्रात निधीअभावी अनेक विकासकामे प्रलंबित आहेत.
महेश पाठक म्हणाले, कुपवाड ड्रेनेज योजनेचा प्रस्ताव दिल्यास तो तातडीने मंजूर केला जाईल. उपयोगकर्ता कर गरजेचा आहे. तो पूर्ण माफ होणार नाही.
चौकट
चौपाटीप्रमाणे नदीकाठ विकास
कृष्णा नदीवरील वसंतदादांच्या स्मारकाजवळच पूरसंरक्षक भिंतीचे सुमारे दोनशे मीटरचे काम शिल्लक आहे. ती जागा खासगी आहे. ती संपादित करावी लागणार असल्याने नगरविकास विभागाने मदत करावी, अशी विनंती जयंत पाटील यांनी शिंदे यांना केली.
चौकट
शामरावनगरसाठी योजना
शंभरफुटी परिसरात शामरावनगरसह अन्य ठिकाणी पावसाळी पाणी साचण्याचा प्रश्न मोठा आहे त्यासाठी स्टॉर्म वॉटर ड्रेनेज आहे. ती पूर्ण केली, तर तो पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, असे जयंत पाटील म्हणाले.