वडूज : ‘येरळा धरणालगत सुरू असलेला वाळू उपसा गंभीर बाब असून, संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. टंचाईची भयानकता लक्षात घेऊन लवकरच उरमोडीचे पाणी खटाव, माणला देण्याचे नियोजन केले जाईल. येरळवाडी धरणातही हे पाणी सोडण्यात येणार आहे,’ अशी माहिती सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.येरळवाडी धरणाच्या डाव्या पोटकालव्याच्या दुरुस्तीचा प्रारंभ खोत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सभापती संदीप मांडवे, प्रांत दादासाहेब कांबळे, तहसीलदार प्रियांका पवार-कर्डिले, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, तानाजी देशमुख, शंकर फडतरे, लाभक्षेत्रातील गावोगावचे सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.सदाभाऊ खोत यांनी येरळवाडी धरण येथे भेट देऊन पाणीसाठ्याची माहिती घेतली. येणाऱ्या कालावधीत धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. चार दिवसांपूर्वी वडूज येथे झालेल्या टंचाई आढावा बैठकीत येरळवाडी कालव्याची दुरुस्ती करण्याचे आश्वासन खोत यांनी दिले होते. आज प्रत्यक्ष पाहाणी करून त्यांनी या कामाचा प्रारंभही केला. पाटबंधारे विभागाकडून कालव्यातील गाळ काढणे आणि रुंदीकरणासाठी यांत्रिक सामुग्री उपलब्ध करण्यात आली.खटाव आणि माण तालुक्यांतील वडूज, मायणी, औंध, पुसेसावळी, आंधळी, शिंगणापूर या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांच्या थकित वीजबिलाच्या प्रश्नांबाबत उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचे खोत यांनी सांगितले. उरमोडी योजनेचे पाणी येणाऱ्या टंचाई काळात खटाव आणि माण तालुक्यात सोडण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, येरळवाडीच्या पोटकालव्याचे काम सुरू झाल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी झेडपी सदस्य सुरेंद्र गुदगे, सरपंच शिवाजी, ज्ञानेश्वर इंगवले, अतुल पवार, सचिन दहातोंडे, सरपंच अनिल उपस्थित होते. (प्रतिनिधी)वाळू उपशाबाबत त्वरित कारवाई ...येरळवाडी धरणाच्या पायथ्यालगत खुलेआम वाळू उपसा सुरू आहे. वाळूमाफियांच्या बेसुमार वाळू उपशामुळे धरणाला धोका निर्माण होत असल्याचे प्रसिद्धी माध्यमांनी वारंवार निदर्शनास आणूनही महसूल विभागाकडून कारवाई करण्यात दिरंगाई होत आहे. शुक्रवारी सदाभाऊ खोत यांनी या प्रकरणात स्वत: लक्ष घातले. अधिकाऱ्यांना वाळू उपशाविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. धरण कुरतडणाऱ्या वाळूमाफियांशी लागेबांधे असणारे अधिकारी याप्रकरणी काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.घरात वर्षश्राद्ध असून दौरा..सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांच्या घरात वर्षश्राद्धाचा दु:खद विधी असताना देखील दुष्काळी भागातील टंचाईची तीव्रता लक्षात घेऊन त्यांनी भर उन्हात चार किलोमीटर चालत येरळा तलाव परिसराची पाहणी केली. सर्व अधिकाऱ्यांनी सतर्क राहून काम करण्याच्या सूचना दिल्या. या हजरजबाबीपणामुळे उपस्थित शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले.
उरमोडीचे पाणी खटाव-माणला आणणार
By admin | Published: April 07, 2017 10:50 PM