मिरज : मिरजेतील खासगी कोविड रुग्णालयातील कचरा व रुग्णांनी वापरलेले साहित्य महापालिकेच्या घंटागाडीत टाकण्यात येत आहे. कोविड रुग्णांचा कचरा नेणारी घंटागाडी रोज सकाळी शहरातील विविध भागात फिरून घरगुती कचरा गोळा करीत असल्याने कोरोना संक्रमणाचा धोका निर्माण झाला आहे. महापालिकेने कोविड रुग्णालयातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी हाेत आहे.
महापालिकेकडून कोरोना रुग्णालयातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था असल्याचे सांगण्यात येते; मात्र घरोघरी कचरा गोळा करणाऱ्या वाहनातच कोविड रुग्णालयातील कचरा वाहून नेण्यात येत असल्याचे चित्र आहे. रुग्णालयातून पीपीई किटधारक कामगार कचरा टाकतात; मात्र महापालिकेच्या सफाई कामगारांना कोणतेही संरक्षण नसल्याचे चित्र आहे. कोविड कचरा वाहून नेण्यासाठी घंटागाड्या वापरण्यात येत असल्याने शहरात काही भागात घंटागाडीचालकांना कोविडची लागण झाली आहे. कोविड कचरा नेण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र व्यवस्था करणे आवश्यक असतानाही साधारण वाहनातून कोविड रुग्णालयातील कचरा नेण्यात येत आहे.
चालकास व कामगारांना पीपीई किट नाही. कोविड कचरा नेणाऱ्या या वाहनांचे निर्जंतुकीकरण केले जात नाही. यामुळे कोविड संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने महापालिकेने कोविड कचऱ्यासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करावी. जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाने याबाबत उपाययोजना कराव्यात व हलगर्जी करणाऱ्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आहे.
चाैकट
भोजन व रुग्णांनी वापरलेल्या साहित्याचा कचरा
कोविड रुग्णालयातील कचऱ्याबाबत वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असून, कोरोना रुग्णांनी भोजन व इतर कारणांसाठी वापरलेल्या साहित्याचा कचरा घंटागाडीतून नेण्यात येत असल्याचे महापालिका स्वच्छता निरीक्षकांनी सांगितले. कोरोना रुग्णांनी वापरलेले सर्व साहित्य जाळून नष्ट करावयाचे असतानाही सफाई कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घालण्यात येत आहे.