सांगली : जिल्ह्यातील विकासकामे प्रभावीपणे होण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा प्रभावी वापर होतो; मात्र यंदा आर्थिक वर्ष संपण्यास कमी कालावधी उरला असतानाही अद्यापही काही विभागांनी निधीचा विनियोग केलेला नाही. त्यामुळे मंजूर झालेल्या निधीचा विकास कामांसाठी तातडीने वापर करावा, अशी सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी गुरुवारी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन समिती निधी विनियोग आढावा बैठकीत पालकमंत्री पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री पाटील म्हणाले, यंदा कोरोनाशी सामना करतानाही शासनाने विकासकामांसाठी प्राधान्य कायम ठेवले आहे. त्यामुळे विकास कामे गतीने आणि मुदतीत पूर्ण होण्यासाठी यंत्रणांनी दक्षता घ्यावी. मंजूर निधी परत जाणार नाही, याबाबत नियोजन करावे. तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता तातडीने घेतल्यास निधीचा वापर वेळेत होणार आहे.
दिव्यांगांसाठी देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रासाठी तालुकास्तरावर विशेष अभियान राबविण्याच्याही सूचना यावेळी त्यांनी दिल्या. यावेळी पालकमंत्री विविध विभागांचा आढावा घेत निधी वापराबाबतही सूचना केल्या. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
------------------------------
फोटो २४ सिटी ०२ एडीटोरियल