सांगली : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे वारे वाहत असताना सांगली जिल्ह्यातील नागरिक मात्र पूर्णत: बेफिकीर आहेत. गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना जमावबंदी आदेश जारी करावे लागले, तरीही लोकांना जबाबदारीचे भान राहिले नसल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यात दररोज सरासरी १० ते २५ नवे कोरोनाबाधित आढळत आहेत. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत ही संख्या फारशी नाही; पण सातारा, कोल्हापूर, सोलापूर या लगतच्या जिल्ह्यांत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना सांगलीकर मात्र त्यापासून बोध घेण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीत. वानलेसवाडीतील मनोरंजननगरीमध्ये उडालेली झुबंड पाहून ती बंद करण्याची कारवाई प्रशासनाला करावी लागली. शहरातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर बाजारपेठांत किमान ५० टक्के सदगृहस्थ विनामास्क फिरत असतात. २५ टक्के मास्क नाकाऐवजी हनुवटीवर घसरलेला असतो. बाकी २५ टक्केच मास्क घातलेले दिसतात. एसटीचे प्रवासी आणि खुद्द चालक-वाहकदेखील मास्क वापरताना दिसत नाहीत. सरकारी कार्यालयांतही बेफिकिरी वाढली आहे. येत्या मार्चमध्ये लॉकडाऊनची वर्षपूर्ती होत असल्याच्या काळात सांगलीकरांनी अनुभवातून शहाणपण घेतले नसल्याचेच यानिमित्ताने सिद्ध होत आहे. व्यवसाय, व्यापार, रोजगार यातून कोट्यवधींचे नुकसान सोसूनही गांभीर्य राहिलेले नाही.
आरोग्य यंत्रणेच्या मते कोरोनाची संभाव्य दुसरी लाट अत्यंत तीव्र असेल. त्यामुळे कोरोनाची जास्तीजास्त काळजी घ्यायला हवी. मास्क, सॅनिटायजरचा वापर शंभर टक्के व्हायला हवा. कोरोनातून बरे झालेल्यांनी तर जास्तच काळजी घ्यायला हवी. पण त्याऐवजी बेफिकिरीच जास्त दिसत आहे. ही बेफिकीर लॉकडाऊनकडे नेणारी ठरत आहे.
कोट
आठ-दहा महिन्यांच्या गॅपनंतर शाळा सुरू झाल्या आहेत. लोकांनी मास्क न वापरून कोरोनाला उत्तेजन दिले तर पुन्हा लॉकडाऊन लागेल, शाळा बंद होतील. ऑनलाईनवरून कंटाळवाणा अभ्यास करावा लागेल. मित्र-मैत्रिणी नेहमीप्रमाणे भेटणार नाहीत. यामुळे सर्वांनी मास्क वापरण्याचे आवाहन मी करते. घरातही आई-बाबा, दीदी मास्क वापरते की, नाही यावर लक्ष ठेवते. मीदेखील शाळेत गेल्यावर मास्क, सॅनिटायजरचा वापर न विसरता करते. सुरक्षित अंतर ठेवून वर्गात बसते.
- जान्हवी संजय रुपलग, इयत्ता सहावी, आयडियल इंग्लिश स्कूल, मिरज
गेल्या वर्षभराचा कोरोनाचा इतका मोठा फटका बसल्यानंतरही बेफिकिरी कमी झालेली नाही हे पाहून भीती वाटल्याशिवाय राहत नाही. मास्क घालण्यासाठी मोठ्यांना सूचना देणे शक्य नाही; पण वर्गात मात्र पूर्ण खबरदारी घेतो. मित्र-मैत्रिणींनी मास्क काढल्यास सूचना देतो. तरीही ऐकले नाही तर त्याच्याशी संपर्क टाळतो. घरातही मम्मी, पप्पासह नातेवाइकांना बाहेर जाताना मास्क आणून देतो. ते घरात परतल्यानंतर स्वच्छतेची आठवण करून देतो.
- झोया फैज मुश्रीफ, इयत्ता आठवी, न्यू इंग्लिश स्कूल, मिरज
माझे वडील प्राणी शुश्रूषेच्या निमित्ताने दिवसभर घराबाहेर असतात. ते परततात तेव्हा कोरोनाच्यादृष्टीने संपूर्ण स्वच्छतेसाठी आठवण करते. घरात भरपूर प्राणी असल्याने अन्य संसर्ग होऊ नये याचीही काळजी घ्यावी लागते. शहरात मास्क न घालता बेफिकिरीने वागणारे नागरिक पाहून वाईट वाटते. शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत लोकांनी काळजी घ्यायला हवी. कोरोनाची दुसरी लाट कोणालाच परवडणारी नाही.
- रिद्धी अशोक लकडे, इयत्ता बारावी, ज्युबिली कन्याशाळा, मिरज
कोरोनाची दुसरी लाट आल्यास शाळा पुन्हा बंद होतील, अभ्यासाचे नुकसान होईल. त्यामुळे कोरोना परतून येऊ नये यासाठी सर्वांनीच जबाबदारीने वागायला हवे. वर्गात आम्ही सर्व मित्र मास्क वापरतो. शाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही मास्क वापरासाठी वेळोवेळी आठवण करतो. घरात सॅनिटायजरचा वापर करतो. अत्यावश्यक असेल तरच बाजारपेठेत जातो, अन्यथा घरातच अभ्यास करीत थांबतो. मोठ्यांनीही लहानांच्या सुरक्षित भविष्यासाठी मास्क वापरायला हवा.
- आदित्य विनोद रेणके, इयत्ता आठवी, ब्राईट फ्युचर स्कूल, सांगली.
बाजारात खुलेआम फिरणारी माणसे पाहून भीती वाटते. त्यामुळे आम्ही बाहेर पडताना पुरेशी काळजी घेतो. पूर्ण चेहरा झाकूनच बाजारात जातो. बाबा ड्युटीवरून परतल्यानंतर सॅनिटायजर वापरूनच घरात येतात. गावातील लोकांनी मास्क आणि सॅनिटायजरचा वापर करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे, त्यांचा सल्ला मानला पाहिजे. अन्यथा, कोरोना पुन्हा फैलावेल, पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल.
समीक्षा पोपट मलगुंडे, इयतात सातवी, चिकुर्डे
मोठ्यांनी मास्क वापरला तरच लहानांना समाजात सुरक्षित वावरता येईल. कोरोनाला गांभीर्याने न घेतल्याचा फटका सर्वांना बसला आहे. गेले वर्षभर कोरोनाच्या भयानक सावटाखाली जगत आहोत. ही परिस्थिती पुन्हा येऊ नये यासाठी सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे. आम्ही होस्टेलवरही पुरेशी काळजी घेऊनच राहतो. घरातही मास्क, सॅनिटायजर अशी पुरेशी काळजी घेतात. याचे अनुकरण सर्वांनीच केले पाहिजे.
- राजवीर सत्यजित पाटील, इयत्ता आठवी, सांगली.
कोरोना कमी झाला असला तरी तो पूर्णत: गेलेला नाही हे नागरिकांनी लक्षात ठेवावे. थोडीशी बेफिकिरी मोठ्या संकटाला आमंत्रण देऊ शकते. कोरोनाचे नियंत्रण ही सर्वांचीच जबाबदारी आहे. गेल्या वर्षभराचा काळ सर्वांसाठी वेदनादायी होता. ते दिवस पुन्हा येऊ नयेत यासाठी सर्वांनी मास्क वापरावे. गर्दी टाळावी. बाजारपेठेत आवश्यक असेल तरच खबरदारी घेऊन जावे.
- डॉ. अभिजित चौधरी जिल्हाधिकारी