सांगली : बांगलादेशातून फसवून आणि बेकायदेशीरपणे सांगलीत आणलेल्या तरुणींना वेश्या व्यवसायात ढकलण्यात येत असल्याचे चव्हाट्यावर येत आहे. काही महिन्यांपूर्वी यातील एका तरुणीने तक्रार करत या रॅकेटचा भांडाफोड केला असला, तरी अजूनही येथील गोकुळनगर, स्वरूप टॉकीज परिसरात अशा तरुणींना आणले जात आहे. एजंट आणि वेश्या वस्तीतील घरमालकिणींचे पोलिसांशी लागबांधे असल्यानेच असे प्रकार दाबले जात असल्याची चर्चा आहे.सांगली-मिरज वेश्या व्यवसायाचे मोठे केंद्र बनले आहे. कर्नाटक, पश्चिम बंगाल, उत्तर भारतासह बांगलादेशातील तरुणींना नोकरी किंवा लग्नाचे आमिष दाखवून बेमालूमपणे येथे आणले जाते. बांगलादेशातून मुलींना आणताना कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता केली जात नाही. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने या व्यवसायात उतरवले जाते. मात्र, स्थानिक प्रशासन, पोलिसांचे यावर नियंत्रण दिसत नाही.बाहेरच्या देशातून आणलेल्या या तरुणींना स्थानिक ओळखपत्र, आधार कार्डही तयार करून देणारी टोळी सक्रिय आहे. अशा तरुणींबाबत कोणी माहिती दिलीच तर सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. सामाजिक संघटना किंवा पीडित तरुणींनी तक्रार केलीच तर घरमालकिणींचे पोलिसांशी लागबांधे असल्याने असे प्रकार दाबले जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या तरुणींचे स्थानिक आधार कार्ड दाखवून तक्रार करणाऱ्या सामाजिक संघटनांना गप्प केले जाते. तरुणींची इच्छा नसताना त्यांच्या आयुष्याशी खेळ खेळला जात आहे.
आमिषाला भुलली, राखरांगोळी झाली
बांगलादेशातील आर्थिक स्तर लक्षात घेता तेथील तरुणींना भारताविषयी आकर्षण वाटते. त्यामुळे कोलकाता किंवा मुंबईत चांगली नोकरी लावण्याचे, लग्नाचे आमिष दाखवून देखण्या तरुणींना येथे आणले जाते आणि वेश्या व्यवसायात ढकलले जाते.
तेवढ्यापुरती कारवाईबांगलादेशातील मुलींना येथे आणून त्यांना वेश्या व्यवसायात ढकलण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत यावर आवाज उठवला होता. तेवढ्यापुरती कारवाई झाली. काही खमक्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारांना पायबंद घातला होता. आता मात्र पुन्हा हे प्रकार सुरू झाले आहेत.
बनावट आधार कार्ड
पोलिस अथवा अन्य प्रशासनाच्या कारवाईत भांडाफोड होऊ नये म्हणून एजंट आणि घरमालकीण या मुलींचे बनावट आधार कार्ड काढतात. सांगलीत काही बांगलादेशी महिलाच हा कारभार करत असल्याचे बोलले जाते. या मुलींना भारताविषयी काहीही माहिती नसते. मात्र, त्यांना आधार कार्ड मिळाले आहे.