लिंगनूर : उन्हाचा पारा वाढत असल्याच्या काळात पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्याची कोरडी आवाहने व्हायरल होत आहेत. खटाव (ता. मिरज ) येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी मात्र यापुढे एक पाऊल टाकत पक्षी व झाडांसाठी पाण्याची प्रत्यक्ष सोय केली. शाळेच्या परिसरातील झाडांवर पाण्याच्या बाटल्या अडकवून सुशोभिकरणही केले.पाणी पिल्यानंतर फेकून दिलेल्या प्लास्टीक बाटल्या विद्यार्थ्यांनी याप्रकारे सत्कारणी लावल्या. शिक्षक सुनील लांडगे व सहकार्यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबविला. उन्हाची तीव्रता वाढत असताना शाळेच्या भोवतालीची वनराई वाळू लागली होती, त्यावर बसणार्या पक्षांचीही पाण्यासाठी तडफड सुरु होती. हे लक्षात घेऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी घरातून प्लास्टीक बाटल्या आणल्या.
शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अर्ध्यातून कापून पाणी भरले. झाडांच्या फांद्यांवर दोरीने अडकविल्या. यातून झाडांचे सुशोभिकरण, प्लास्टीकचा सदुपयोग आणि पक्ष्यांची तहान या तिन्ही गोष्टी साध्य झाल्या, शिवाय विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी प्रेम निर्माण करण्यात शिक्षक यशस्वी ठरले.
शिक्षक लांडगे म्हणाले की, दररोज झाडांना पाणी घालणे शक्य नसल्याने ठिबक सिंचनाचा पर्याय सुचला, त्यासाठी टाकाऊ प्लास्टीक बाटल्यांचा वापर केला. फांद्यांवर अडकवितानाही त्यामध्ये कलाकृती आकार घेईल याचे भान ठेवले.
चार मुलांचा एकेक गट केला, प्रत्येक गटाला एक झाड दिले. विद्यार्थ्यांनी बाटल्या झाडाच्या बुंध्याशी ठेवल्या. त्यामुळे झाडांची तहान भागली. बाटलीतील पाणी तीन-चार दिवस पुरते, त्यामुळे विद्यार्थ्यांना झाडाकडे दररोज लक्ष देण्याची गरजही राहिली नाही. बाटल्या कापून ठेवल्याने पक्षांची तहानही भागली.