सांगली : शहरातील वाढत्या लोकसंख्येसोबतच कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्नही तितकाच मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यात नागरिकांनी वापरलेल्या मास्कचे काय केले जाते, असा प्रश्न पडतो. घरातील कचऱ्यातून येणारे मास्क घंटागाडीतून कचरा डेपोवर जातात. तर रुग्णालयातील कचऱ्याची भस्मीकरण केंद्रात प्रक्रिया केली जात असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
महापालिकेने गेल्या दोन ते तीन वर्षांत कचरा उठाव करणारी यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला आहे. कचरा उचलण्यासाठी लागणारी वाहनांची खरेदीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. सध्या प्रत्येक प्रभागासाठी दोन रिक्षा घंटागाड्या आहेत. या रिक्षा घंटागाड्या नागरिकांच्या दारापर्यंत जाऊन कचरा उचलत आहेत. कचरा गोळा करताना ओला कचरा आणि सुका कचरा असे विघटनही करण्यात येत नाही. तसेच कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणाही महापालिकेकडे नाही. घनकचरा प्रकल्प रखडल्याचे परिणाम कोरोनाच्या काळात समोर येत आहेत. कोरोनामुळे मास्क, सॅनिटायझर वापराचे प्रमाण वाढले आहे. कचऱ्यामध्ये मास्क, हँड ग्लोव्ह्ज यासारखे घटकही पहायला मिळतात. हा कचरा घंटागाडीतून कचरा डेपोवर जातो. तिथे मास्क, ग्लोव्हज वेगळे केले जात नाहीत.
चौकट
रुग्णालयातील कचऱ्यावर होते प्रक्रिया
वैद्यकीय महाविद्यालयात दैनंदिन कचऱ्यासोबतच आता कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांचा वापराचा कचरा जमा होतो. यामध्ये पीपीई कीट, मास्क, हँड ग्लोव्ह्ज, ऑपरेशनचे साहित्य यासह विविध निरूपयोगी साहित्य कचऱ्यामध्ये टाकण्यात येते. वैद्यकीय महाविद्यालये, कोविड रुग्णालये, कोविड केअर सेंटरमध्ये जमा होणाऱ्या या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते. मिरजेत या कचऱ्यावर प्रक्रिया करणारे युनिट आहे. तिथे हा कचरा भस्म केला जातो. अलीकडे या कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे.
चौकट
दररोजच्या कचऱ्यातील मास्कचे काय?
महापालिका हद्दीत जमा होणारा संपूर्ण कचरा वाहनांद्वारे शहराबाहेरील कचरा डेपोवर नेऊन टाकला जातो. सांगलीतील कचरा समडोळी रस्त्यावरील तर मिरज, कुपवाडचा कचरा बेडग रोडवरील डेपोवर टाकला जातो. कचऱ्यामध्ये मास्क, हँड ग्लोव्ह्ज, कीट यासह अनेक वस्तू पहायला मिळतात. शहरातील नागरिकांनी रस्त्यावर टाकलेला हा कचरा जमा होऊन तो शहराच्या बाहेर टाकला जातो. याठिकाणी कचऱ्यात मास्कसारख्या वस्तू पहायला मिळतात.
कोट
आरोग्याच्यादृष्टीने सर्वांनीच मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. मास्क वापरल्यानंतर तो निर्जंतुकीकरण करणेही गरजेचे आहे. मास्क उघड्यावर फेकणे हे सर्वाधिक धोकादायक आहे. यापासून कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. यामुळे नागरिकांनी कचऱ्यामध्ये मास्क न टाकता ते एका साईडला ठेवायला हवेत. नागरिकांनी मास्क कुठेही न फेकता त्याची खबरदारी घेण्याची आणि प्रसार न होण्याची काळजी घेतली पाहिजे.
- डाॅ. रवींद्र ताटे, वैद्यकीय अधिकारी, महापालिका