सांगली : दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांना हद्दपारीची नोटीस शहर पोलिसांनी बुधवारी दुपारी बजावली. ४८ तासांत जिल्ह्यातून स्वत:हून बाहेर जावे, अन्यथा गुन्हा दाखल करून पोलीसच तडीपारीची अंमलबजावणी करतील, असा इशारा दिला. दरम्यान, मोहिते यांची तडीपारी निंदनीय असून, कारवाईला आव्हान देणार असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष प्रा. मधुकर वायदंडे यांनी दिली.
वायदंडे म्हणाले, मोहिते यांच्यावरील कारवाई निंदनीय असून, दलित चळवळ बंद करण्याचा पोलिसांचा डाव आहे. कारवाईसाठी सांगलीत सक्षम अधिकारी उपलब्ध असतानाही जतच्या उपाधीक्षकांना नियुक्त का केले, हा आमचा प्रश्न आहे. मोहिते, पत्नी ज्योती व महिला आघाडीच्या अध्यक्षा वनिता कांबळे यांना टोळी म्हणून पोलिसांनी संबोधल्याबद्दल न्यायालयात दाद मागू. जिल्ह्यात अवैध धंद्यांना ऊत आलेला असताना पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष आहे. त्याऐवजी संघटना व कार्यकर्त्यांना टार्गेट केले जात आहे. यासंदर्भात आंदोलनाची भूमिका लवकरच जाहीर करू.
यावेळी सतीश मोहिते, सनातन भोसले, अनिल आवळे, सुधाकर वायदंडे, डॉ. आर. बी. सौदागर, सचिन मोरे, प्रशांत सदामते, प्रवीण वारे, राजेंद्र चव्हाण, शंकर माने, विकास घाटे, रामदास भोरे, महेश देवकुळे, अजित आवळे, विज्युत भोसले, विजय आठवले, तेजस भोरे, सागर कांबळे आदी उपस्थित होते.