महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती पांडुरंग कोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत चैत्रबन ते आरवाडे पार्कपर्यंतच्या नाल्याचे बांधकाम करण्यासाठी दहा कोटींच्या निधीला मान्यता देण्याचा विषय आला होता. वित्त आयोगाच्या ३३ कोटींच्या निधीतील रकमेतून दहा कोटींचे नाले बांधकाम करण्याचा प्रस्ताव काँग्रेसचे नगरसेवक संतोष पाटील यांनी आयुक्तांमार्फत शासनाकडे पाठविला होता. शासनाने त्याला परवानगी दिली होती. त्यानुसार गेल्या स्थायी समितीच्या सभेत चैत्रबन ते आरवाडे पार्कच्या कामाची निविदा काढण्यास मंजुरी देण्याचा विषय आला होता.
स्थायी सदस्यांना जिल्हा नियोजनच्या सात कोटी रुपयांच्या निधीतून डावलले होते. परस्परच या निधीचे वाटप महापौरांकडून मंजूर करून घेतले होते. त्याचा रोष सदस्यांच्या मनात होता. गुरुवारी संतोष पाटील यांच्या वाॅर्डातील विषय येताच सदस्यांनी उट्टे काढण्याची संधी साधली. चैत्रबन ते आरवाडे पार्कचा नाला बांधकामासाठी दहा कोटी खर्च करण्यास सदस्यांनी विरोध केला. विजयनगर नाला, कुपवाड बजरंगनगर ते भारत सूतगिरणीपर्यंतचा नाला, कुपवाड येथील कैकाडी स्मशानभूमी ते यल्लम्मा मंदिर, भीमनगर झोपडपट्टी ते मीरा हौसिंग सोसायटी व रेल्वे गेट ते ईदगाहपर्यंतच्या या पाच नाल्यांची बांधकामे करावीत, अशी मागणी सदस्य गजानन मगदूम, सविता मदने, अनारकली कुरणे, शेडजी मोहिते, पद्मश्री पाटील यांनी केली. सभापती पांडुरंग कोरे यांनी शासन आदेशाबाबत अधिकाऱ्यांना खुलासा करण्याचे आदेश दिले. अधिकाऱ्यांनी कोणतेही स्पष्ट निर्देश नसल्याचे सांगितले. अखेर सभापती कोरे यांनी दहा कोटीतून सदस्यांनी सुचविलेल्या पाच नाल्यांचे बांधकाम करण्यासाठी अंदाजपत्रक करावे व पुढच्या सभेत सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. चैत्रबन ते आरवाडे पार्कपर्यंतचा नाला बांधकामाचा प्रस्तावही रद्द केला.
चौकट
बरखास्तीची भीती दाखवू नये : पांडुरंग कोरे
शहराच्या विकासासाठी भाजपचे दोन्ही आमदार व आम्ही प्रयत्न करत आहोत. शंभर कोटींच्या निधीचा दुजाभाव न करता सर्वांना न्याय दिला. मात्र सध्या एकाच नाल्यावर दहा कोटी खर्च करण्याच्या कामाला मंजुरी देण्यावरून काहीजण आमच्यावर दबाव टाकत होते. स्थायी समिती बरखास्त करण्याचा इशारा देत होते. तुम्हाला बरखास्तीचे अधिकार कोणी दिले? त्यांनी बरखास्तीची भीती दाखवू नये, असा हल्ला सभापती पांडुरंग कोरे यांनी नगरसेवक संतोष पाटील यांच्यावर केला.