दुधोंडी : कोरोनाच्या या महामारीमध्ये शहरी व ग्रामीण भागांमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक गरजा भागवण्यात नागरी बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कामकाज करताना त्यांचा बऱ्याच लोकांशी संपर्कात येत असल्यामुळे बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे, अशी मागणी नागरी बँक असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर जाधव यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
ते पुढे म्हणाले की, बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा नागरिकांशी जास्त संपर्क येत आहे. यामुळे या कर्मचारी, अधिकाऱ्यांना कोरोनाचा धोक्का जास्त आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काहींना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. तरीही बँकिंग सेवेमध्ये खंड पडू दिलेला नाही. राज्य व देशपातळीवरही बँकेच्या अधिकारी व कर्मचारी यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव केलेला आहे. म्हणूनच सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वयाचा विचार न करता शंभर टक्के लसीकरण केले पाहिजे, अशी मागणी केली आहे.