लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : सध्या कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. न्यायालयातील वकील, त्यांचे लिपिक व न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा जनतेशी सततचा संपर्क आहे. त्यामुळे शासनाने विटा न्यायालयात काम करणारे वकील, त्यांचे लिपिक व न्यायालयीन कर्मचाऱ्यांना तातडीने कोरोना लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विटा वकील संघटनेने जिल्हाधिकारी व तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली.
विटा येथील वकील संघटना, त्यांचे लिपिक व न्यायालयीन कर्मचारी यांना कोरोना व्हॅक्सिन देण्यासाठी वेळोवेळी संबंधित आरोग्य अधिकारी व महसूल अधिकाऱ्यांना कळविलेले होते. परंतु, न्यायालयीन कर्मचारी व वकील संघटनेच्या सदस्यांना व्हॅक्सिन देता येत नाही. कारण ते आमच्या नियमात बसत नसल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक, वकील, त्यांचे क्लार्क व न्यायालयीन कर्मचाऱ्यांना जनतेशी प्रत्यक्ष सततचा संपर्क येत आहे. कोरोनाचा प्रभाव वाढू लागल्याने न्यायालयीन काम करणे धोकादायक झालेले आहे.
त्यामुळे शासनाने वकील संघटनेचे सदस्य, त्यांचे लिपिक व न्यायालयीन कर्मचाऱ्यांना तातडीने कोरोना लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. वकील संघटनेच्यावतीने तहसीलदार ऋषीकेत शेळके यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष अॅड. एस. जी. घोरपडे, उपाध्यक्षा अॅड. शौर्या पवार, सचिव अॅड. पी. एस. बागल, सहसचिव अॅड. पी. एस. माळी, अॅड. सचिन जाधव यांच्यासह वकील संघटनेचे पदाधिकारी व वकील उपस्थित होते.