लोकमत न्यूज नेटवर्क
कडेगाव : कडेगाव तालुक्यात ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील ४३ हजार ८०२ लोकसंख्येपैकी ८ हजार ७७६ लोकांनी
कोरोना लस घेतली आहे. साठ वर्षांवरील ३३ हजार ३९ लोकसंख्येपैकी ८ हजार ७७६ लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. तालुक्यातील एकंदरीत १७ हजार ५११ लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.
कडेगाव तालुक्यात आता १८ ते ४५ वर्षे वयोगटातील लसीकरण सुरू होणार आहे. यामुळे शासनाने घालून दिलेल्या तिन्ही वयोगटातील मिळून जवळपास लाखाहून अधिक लोकांचे लसीकरण करण्याचे आव्हान आरोग्य प्रशासनासमोर आहे. तालुक्यातील तरुणाईचा लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदी करण्याकडे अधिक कल आहे.
कडेगाव तालुक्यात प्रशासन, आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर जनजागृती मोहीम राबवीत आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासाठी कोरोना लसीचे डोस कमी प्रमाणात मिळत असल्यामुळे त्याचा थेट परिणाम तालुकास्तरावरील लसीकरणाच्या मोहिमेवर झाला आहे. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचाऱ्यांनी होम टू होम सर्वेक्षण व जनजागृती केली आहे. सुरुवातीच्या काळात लसीकरणाला अपेक्षित यश मिळाले नव्हते. मात्र, तालुक्यात कोरोनाचा कहर सुरू झाल्यानंतर लसीकरणासाठी गर्दी होत आहे. लसीकरणासाठी मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. मागील चार दिवसांपासून
मात्र लसींच्या पुरवठ्याअभावी लसीकरण बंद आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण खूप महत्त्वाचे असल्याने नागरिक लसींच्या प्रतीक्षेत आहेत.
चौकट
दुसऱ्या डोसची प्रतीक्षा
कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे
मात्र महिना, दीड महिना झाला तरी
दुसरा डोस मिळाला नाही अशा
नागरिकांची संख्याही मोठी आहे. एकाच वेळी १० लोक डोस घेण्यासाठी उपस्थित असतील तरच डोस देता येतो. मात्र, ते डोसही आता उपलब्ध नाहीत, त्यामुळे
संबंधित नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत.