इस्लामपूर : वाळवे तालुक्यातील ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांसह २२ उपकेंद्रांवर ३४ हजार ८७२ नागरिकांचे कोविड लसीकरण पूर्ण झाले आहे. नेर्ले केंद्रावर सर्वाधिक ४ हजार ५७९ व्यक्तींचे, तर उपकेंद्रांमध्ये येडेनिपाणी येथे एक हजार ४० जणांचे लसीकरण झाल्याची नोंद आहे.
तालुका आरोग्याधिकारी डॉ. साकेत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांवर ही लसीकरण मोहीम नियोजनबद्धपणे सुरू आहे. या ११ आरोग्य केंद्रांवर सरासरी रोज पाच हजार व्यक्तींचे लसीकरण केले जात आहे. उपकेंद्रांवर तीन हजार व्यक्तींचे लसीकरण होत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात आला आहे. बावची (२९००), बागणी (२७११), वाळवा (३०९६), बोरगाव (३४९९), पेठ (३२४०), वाटेगाव (२६५१), नेर्ले (४५७९), कामेरी (२९४७), येलूर (२७२३), कुरळप (३२५८), येडेमच्छिंद्र (३२६१) असे एकूण ३४ हजार ८७२ जणांचे लसीकरण झाले आहे.