सांगलीत वसंतदादा साखऱ कारखान्यासमोरील महापालिकेच्या आरोग्यवर्धिनी केंद्रावर गुरुवारी सकाळी कोरोना लस घेण्यासाठी अशी झुंबड उडाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यासाठी कोरोना लसीचे आणखी २५ हजार डोस गुरुवारी प्राप्त झाले. यामुळे शुक्रवारी व शनिवारी लसीकरण सुरू राहणार हे निश्चित झाले आहे. दरम्यान, गुरुवारी पलूस व कडेगाव तालुक्यांत लस संपल्याने लसीकरण ठप्प झाले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशभरात लस उत्सव साजरा करण्याचे आवाहन करीत असताना त्यासाठी लसच उपलब्ध नाही अशी अवस्था जिल्ह्यात निर्माण झाली आहे. एक-दोन दिवसांत साठा संपत असून नव्याने पुरवठ्याकडे प्रशासनाला डोळे लावून बसावे लागत आहे. लस घेण्यासाठी नागरिक पुढे येत असताना त्यांना लस देण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. जिल्हाभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये व महापालिकेच्या आरोग्यवर्धिनी केंद्रांवर लस घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत.
गुरुवारी सकाळी लसीचे फक्त ९ हजार डोस शिल्लक होते. जिल्ह्याची दररोजची गरज सरासरी १८ ते २० हजार डोस इतकी आहे. त्यामुळे पलूस व कडेगाव तालुक्यांंतील काही लसीकरण केंद्रांवर दुपारनंतर लस संपली, लसीकरण थांबले. नागरिकांना लस न घेताच परतावे लागले. जिल्हा प्रशासनाच्या पाठपुराव्यानंतर गुरुवारी संध्याकाळी २५ हजार डोस मिळाले. शुक्रवारी सकाळी सातपासूनच त्यांचे वितरण केले जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी दिली. ज्या केंद्रांवर लसीकरण जास्त होते, त्यांना जास्त प्रमाणात लस दिली जाणार आहे.
चौकट
गुरुवारचा लसीकरणाचा लेखाजोखा असा
ग्रामीण भागातील लसीकरण - ५,८५१
निमशहरी भागातील लसीकरण - ९४३
महापालिका क्षेत्रातील लसीकरण - २२५६
खासगीसह एकूण लसीकरण - ९,१५८
आजवरचे एकूण लसीकरण - ३,६९,१५५