सांगली : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना बुधवारी दुपारीच जिल्ह्यातील लसीचा साठा संपल्यामुळे ३६ आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी लसीकरण ठप्प झाले होते. केंद्राच्या बाहेर लसीकरण बंदचे फलक लावल्यामुळे नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले. जिल्ह्यात चार हजार लस शिल्लक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची २२५ केंद्रे आहेत. आतापर्यंत दोन लाख ५९ हजार ५४५ लोकांचे लसीकरण झाले आहे. बुधवारी दुपारपासून जिल्ह्यातील ३६ प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांसह महापालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्रावरील लस संपल्याने नागरिकांना परतावे लागले. अनेक केंद्रांवर लस साठा संपल्याने फलकही लावले होते. बुधवारी सकाळी तेरा हजार लस उपलब्ध होत्या. सायंकाळी लस साठा संपल्याचे प्रशासनाने सांगितले. दिवसभरात विविध केंद्रांवर लसीचा साठा अपुरा असल्यामुळे काही नागरिकांना लस मिळाली. विनालसीचे माघारी परतावे लागल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. जिल्ह्यात सध्या केवळ चार हजार लस शिल्लक असून, गुरुवारी सकाळच्या टप्प्यातच तो संपणार आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दोन लाख लसीची शासनाकडे मागणी केली आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी सांगितले. शासनाकडून लस कधी येईल हेही निश्चित नाही.
लस तातडीने उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, डॉ. मिलिंद पोरे, लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत. पण, राज्यातच लस शिल्लक नसल्यामुळे सांगली जिल्ह्याला लस मिळण्यात अडचणी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
चौकट
दोन लाख लसींची मागणी
आरोग्य विभागाने दोन लाख लसींची मागणी केली असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील, जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांच्याकडून प्रयत्न सुरु आहेत.
चौकट
जिल्ह्यात असे झाले लसीकरण
- आरोग्यसेवक : ३७,६०४
- फ्रंटलाइन वर्कर्स : २४,२१०
-ज्येष्ठ नागरिक : १,२७,५५२
- आजारी नागरिक : ७०,१७९
-एकूण : २,५९,५४५
- शनिवारी एका दिवसात : १४,६५९
- लसीचे दोन डोस घेतलेल्यांची संख्या : २०,१९४
चौकट
दिवसभरात पाचजणांचा मृत्यू
जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे ३८० रुग्ण आढळले. दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू झाला असून २१५ जण काेरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर ५३ हजार ८८८ जणांना कोरोना झाला आहे. (सविस्तर वृत्त - पान ३ वर)