सांगली : सांगली जिल्ह्यात गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद लाभला असून या मोहिमेंतर्गत दिनांक 27 नोव्हेंबर 2018 ते 25 फेब्रुवारी 2019 अखेर अखेर 6 लाख 73 हजार 462 लाभार्थींना लसीकरण करण्यात आले आहे.
यामध्ये ग्रामीण भागात 4 लाख 74 हजार 803, शहरी भागात 58 हजार 142 तर महानगरपालिका क्षेत्रात 1 लाख 40 हजार 517 लाभार्थींना लसीकरण देण्यात आले आहे. ही माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात गोवर व रूबेला लसीकरण मोहिमेच्या जिल्हा समन्वय समिती सभा आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी, निवासी वैद्यकीय अधिकारी शहानवाज नाईकवडी, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. एम. एम. चव्हाण, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस. जे. जोशी आदि उपस्थित होते.निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विजय देशमुख म्हणाले, दिनांक 14 नोव्हेंबर 2018 पासून सांगली जिल्ह्यात गोवर व रूबेला एकत्रित लसीकरण मोहीम राबवण्यात आली. गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेसाठी संपूर्ण जिल्ह्यात 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील 6 लाख 52 हजार 442 लाभार्थींची नोंद झाली होती. पण प्रत्यक्षात 6 लाख 73 हजार 462 बालकांना लसीकरण देण्यात आले.
झालेल्या कामाची ही टक्केवारी 103.22 इतकी आहे. या लसीकरण मोहिमेमुळे गोवर व रूबेला या दोन आजारांपासून मुलांचे संरक्षण होणार आहे. केवळ 9 महिने (पूर्ण) ते 15 वर्षे वयोगटातील बालकांना गोवर व रूबेला (एम.आर./टफ) प्रतिबंधक लसीची एक मात्रा दिल्यास गोवर व रूबेलाची बाधा होण्याची शक्यताच उरत नाही.
या अत्यंत व्यापक दृष्टीकोनातून शासनाने 2020 पर्यंत गोवर रोगाचे उच्चाटन व रूबेलावर नियंत्रण ठेवण्याचा निर्धार केला आहे. सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमांतर्गत 9 महिने (पूर्ण) ते 12 महिने व 18 ते 24 महिने (दुसरा डोस) झालेल्या बालकांना गोवर लसीची एक मात्रा देण्यात येत असून रूबेला लसीचाही समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. एकाच लसीव्दारे बालकांमधील (9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील) दोन आजारांचे प्रमाण कमी होवून बालक व त्यांचे भविष्य दोन्हीही सुरक्षित राहणार आहेत.