कडेगाव : डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर असलेल्या कडेगाव ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेले कोरोना लसीकरण केंद्र जवळच असलेल्या महात्मा गांधी विद्यालयात सुरू करावे तसेच चिंचणी ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्र तेथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये सुरू करता येईल का, याबाबतच्या
व्यवस्था व सोयीसुविधा पहावी, अशा सूचना कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केली.
कडेगाव तहसील कार्यालयात रविवारी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत आढावा बैठक झाली. यावेळी डॉ. कदम बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी डॉ. गणेश मरकड, उपविभागीय पोलीस अधिकारी अंकुश इंगळे व अश्विनी शेंडगे, तहसीलदार डॉ. शैलजा पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशा चौगुले आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. कदम म्हणाले, काेरोनाने मृत झालेल्या व्यक्तींचे अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत व नगरपंचायत प्रशासनाची आहे. तेव्हा अंत्यसंस्कारासाठी मृतांच्या कुटुंबाकडून कोणत्याही प्रकारच्या पैशांची आकारणी करण्यात येऊ नये. कोणी पैसे घेतल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर कडक कारवाई केली जाईल.
यावेळी नगराध्यक्ष संगीता राऊत, उपनगराध्यक्ष दिनकर जाधव, मुख्याधिकारी कपिल जगताप, पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे, डॉ. पौर्णिमा शृंगारपुरे, डॉ. आशिष कालेकर, दीपक भोसले, विजय शिंदे, साजिद पाटील आदी उपस्थित होते.
चौकट
...तर कडक कारवाई करा
विलगीकरणाच्या नियमांचा भंग करून काही कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती घराबाहेर पडून रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी येत आहेत. अशा लोकांवर कडक कायदेशीर कारवाई करा, अशा सूचना राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिल्या आहेत.