कुपवाड : कुपवाड येथील वृद्धाश्रमात अंथरुणावर खिळून असणाऱ्या वयोवृद्धांचे बुधवारी दुपारी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या उपस्थितीत महापालिकेतर्फे लसीकरण करण्यात आले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासन आदेशानुसार सर्वत्र लसीकरण मोहीम सुरू आहे. त्यानुसार कुपवाडच्या वृद्धाश्रमातील ज्यांना चालता-फिरता येते, अशा वृध्दांनी महापालिकेच्या आरोग्य केंद्रात जाऊन लसीकरण करून घेतले. परंतु, जे वृद्ध अंथरुणावर खिळून आहेत, ज्यांना चालता-फिरता येत नाही, ते लसीकरणापासून वंचित राहू नयेत, यासाठी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून, वृद्धाश्रमात येऊन लसीकरण करावे, अशी विनंती केली. त्यानुसार वैद्यकीय पथकाने बुधवारी दुपारी वयोवृद्धांना लसीकरणाचे डोस दिले.
यावेळी प्रा. शरद पाटील म्हणाले, कुपवाड वृद्धाश्रम तसेच कुष्ठरोग वसाहत (मेघजीभाईवाडी) आणि सातारा येथील वृद्धाश्रम या तीनही संस्थेच्या शाखा अविरतपणे पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. विविध सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती यांच्या मदतीचा ओघ वृद्धाश्रमाला आजही सुरू आहे. त्यामुळे संस्थेतील स्त्री-पुरुषांना कोणतीही झळ पोहोचत नाही. महापालिकेच्या सहकार्यामुळे वृद्धाश्रमातील स्त्री-पुरुष वृद्ध व कर्मचारी अशा ६० जणांचे लसीकरण करण्यात आले.
फोटो : २१ कुपवाड २
ओळ : कुपवाड वृद्धाश्रमातील ज्येष्ठांचे प्रा. शरद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने लसीकरण केले.