शिराळा
: शिराळा तालुक्यात कोरोना लसीकरणाबाबत संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून लस उपलब्ध झाल्यावर त्वरित लसीकरणास सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती प्रभारी तहसीलदार आयुशी सिंह, तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली.
शिराळा तहसीलदार कार्यालयात तालुक्याच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेबाबत आयोजित बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील म्हणाले, ही लस तीन टप्प्यामध्ये दिली जाणार आहे. प्रथम आरोग्य विभागातील सर्व डॉक्टर्स, कर्मचारी, आशा, गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका, खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांचे लसीकरण होईल, दुसर्या टप्प्यात उर्वरित सर्व विभाग महसूल, शिक्षण, पोलीस, नगरपंचायत, ग्रामपंचायत आणि इतर सर्व विभाग, तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षे वयोगटावरील रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर आदी रुग्ण यांना लस दिली जाणार आहे.
तालुक्यातील सर्व खासगी व शासकीय संस्था यांची नोंदणी केली आहे. यावेळी गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, सर्व वैद्यकीय अधिकारी व सदस्य, आरोग्य सहायक विस्तार अधिकारी, शिक्षण, अंगणवाडी पर्यवेक्षक उपस्थित होते.