सांगली : लस मिळविण्यासाठी नागरिकांची दाहीदिशा वणवण सुरू आहे. सोमवारी सांगलीतील वीस जणांनी चक्क माडग्याळपर्यंतचा सव्वाशे किलोमीटरचा प्रवास करून लस मिळविण्याचा प्रयत्न केला.
कोरोनाच्या वाढत्या फैलावाने दहशत निर्माण केली असून, सध्यातरी त्यावर लसीकरण ही एकमेव मात्रा दिसत आहे. कोरोनासंसर्गानंतर रुग्णालयात दोन-पाच लाख घालविण्यापेक्षा लस घेतलेली बरी अशी मानसिकता निर्माण झाली आहे; पण शासनाकडून पुरेशी लस येत नसल्याने तीदेखील मिळणे मुश्कील झाले आहे. रविवारी २६ हजार डोस आले; पण त्यातून ४५ वर्षांवरील लोकांना दुसरा डोस राखीव होता, तर उर्वरित डोस १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी देण्यात आले. नागरिकांनी रात्रीपासूनच कोविन पोर्टलवर नोंदणीचे प्रयत्न केले; पण सांगली-मिरज व नजीकची सर्व केंद्रे फुल्ल होती. हार न मानता शोध सुरूच ठेवला. माडग्याळ केंद्रात लस उपलब्ध असल्याचे व अपॉइंटमेंटही मिळत असल्याचे समजले. वेळ वाया न घालवता वीस जणांनी सकाळीच तिकडे धाव घेतली.
सांगली-मिरजेशेजारी ग्रामीण केंद्रांवरही नागरिक धाव घेत आहेत. तासगाव, पलूस, डिग्रज, आरग येथील केंद्रांवर शहरातील लोकांची गर्दी होत आहे. खासगी रुग्णालयांत पंधरवड्यापासून लसीकरण बंद झाले आहे. या रुग्णालयांना शासनाने लसीचा पुरवठा बंद केला असून, थेट कंपन्यांकडून विकत घेण्याची सूचना केली आहे, त्यामुळे नागरिकांना महापालिकेची आरोग्य केंद्रे किंवा जिल्हा परिषदेच्या रुग्णालयांशिवाय पर्याय राहिलेला नाही.
चाैकट
सांगलीत रस्सीखेच आणि वादावादी
सांगलीत सोमवारी सकाळी महापालिकेच्या आरोग्य केंद्रांत लसीकरण सुरू होताच अनेक ठिकाणी गर्दी झाली. ऐनवेळी लसीसाठी आलेल्या लोकांना परत फिरावे लागले. आठवडाभरापासून कर्मचाऱ्यांनी लोकांची नावे लिहून घेतली होती. त्यांनाही लस न मिळाल्याने ते आक्रमक झाले होते. त्यांच्यात हमरीतुमरीही झाली. त्यामुळे नावे लिहून घेण्याचे काम थांबविण्यात आले.