सांगली : जिल्ह्यातील सर्वच लसीकरण केंद्रावरील लस दोन दिवसांपासून बंद आहे. काही अपवादात्मक केंद्रावर शिल्लक लसीतून बुधवारी एक हजार ७६४ लसीकरण झाले आहे. शासनाकडून गुरुवारी दुपारपर्यंत लस उपलब्ध होणार आहे; पण ४५ वर्षे वयोगटातील वरील व्यक्तींच्या लसीकरणासाठीच येणाऱ्या लसीचा वापर करण्यात येणार आहे, असे जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात पाच लाख ३७ हजार ८४५ व्यक्तींचे लसीकरण झाले आहे; पण प्रथम डोस घेतलेल्या चार लाख ८३ हजार ९३ व्यक्तींची संख्या आहे. दुसरा डोस घेतलेल्या व्यक्तींची संख्या केवळ ५४ हजार ७५२ आहे. जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील ७१ टक्के व्यक्तींचे लसीकरण झाले आहे. मुंबईहून कोल्हापूरला गुरुवार, २९ रोजी लस मिळणार आहे. तेथून सांगली जिल्ह्यासाठी लस आणण्यासाठी गाडी जाणार आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर शुक्रवारी केंद्रावर लस पाठविल्यानंतर प्रत्यक्ष लसीकरणास सुरुवात होणार आहे. लसीकरणाचा वेग पाहाता ४५ वर्षांवरील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण होण्यासाठी पंधरा दिवस लागण्याची शक्यता आहे.
चौकट
महापालिका क्षेत्रात ६२ टक्के लसीकरण
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात सुरू असणाऱ्या लसीकरणास नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी आणि सरकारी मिळून एकूण ३१ केंद्रांवर ७२७ व्यक्तींचे लसीकरण केले आहे. आज अखेर महापालिका क्षेत्रातील एक लाख ६८ हजार ३१ व्यक्तींपैकी एक लाख ५९५ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. महापालिका क्षेत्रात २८ एप्रिलअखेर ४५ वर्षांवरील ६२ टक्के व्यक्तींचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
चौकट
जिल्ह्यातील आजपर्यंतचे लसीकरण
प्रथम व्दितीय एकूण
-आजारी व्यक्तींची संख्या : २६०२३ १४८१९ ४०८४२
-फ्रंटलाईन वर्कर : २४२४३ ७७७७ ३२०२०
-ज्येष्ठ नागरिक : २२२६०२ २२९३३ २४५५३५
- ४५ वर्षावरील नागरिक : २१०२२५ ९२२३ २१९४४८
एकूण ४८३०९३ ५४७५२ ५३७८४५