सांगली : पलूस, कडेगाव, वाळवा तालुक्यातील १६ आरोग्य केंद्रांवरील कोरोना प्रतिबंधक लस बुधवारी दुपारी संपली. जिल्ह्यात सध्या पंधरा हजार लस शिल्लक असून, ती एक दिवस पुरेल. लस मिळण्यात विलंब होत असल्यामुळे लसीकरणावर परिणाम झाला आहे. २ एप्रिलला दोन लाख लसींची मागणी केली होती, त्यापैकी एक लाख आठ हजार लसी मिळाल्या.
जिल्ह्यातील २५० लसीकरण केंद्रे असून, तीन लाख ४१ हजार नागरिकांना लस मिळाली आहे. सध्या जिल्ह्यात टंचाई आहे. वाळवा, पलूस, कडेगाव तालुक्यातील १६ लसीकरण केंद्रांवरील लस बुधवारी संपली. यामुळे तेथील लसीकरण बंद केल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी सांगितले. जिल्ह्यात गुरुवारी एक दिवसाचे लसीकरण होईल, एवढीच म्हणजे १५ हजार लस शिल्लक आहे. शुक्रवारी लस मिळाली नाही तर जिल्ह्यातील सर्वच लसीकरण ठप्प होणार आहे. आरोग्य संचालकांकडे तातडीने ५० हजार लसी देण्याची मागणी आरोग्य विभागाने बुधवारी केली आहे. शासनाकडून ही लस मिळाली नाही तर पहिली लस घेऊन महिना झालेल्यांना दुसरी लस वेळेत देणेही खूप कठीण होणार आहे. तीन लाख ४१ हजार नागरिकांचे लसीकरण झालेल्यांपैकी २५ टक्के व्यक्तींना रविवारपासून लसीचा दुसरा डोस देण्याची गरज आहे. या व्यक्तींचे लसीकरण कसे करायचे, असाही प्रश्न आरोग्य अधिकाऱ्यांना भेडसावत आहे.
चौकट
दुसरा डोस रविवारपासून सुरू : मिलिंद पोरे
पहिली लस घेतलेल्या लोकांना दुसऱ्या टप्प्यातील लस देण्याची प्रक्रिया दि. १८ एप्रिलपासून सुरू होणार आहे. रविवारपासून जिल्ह्यातील लसीकरणाचा रोजचा आकडा ३० हजारांच्या पुढे जाणार आहे. म्हणून दोन लाख लसींची मागणी केली होती. त्यापैकी एक लाख आठ लसी मिळाल्या आहेत. सध्या पंधरा हजारच लसी शिल्लक असून, गुरुवारी एका दिवसाचे लसीकरण होईल. शुक्रवारी अडचण येणार असल्यामुळे शासनाकडे तातडीने ५० हजार लसींची मागणी केली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी दिली.
चौकट
आजचे लसीकरण
-ग्रामीण विभाग : १४३१५
-नगरपालिका क्षेत्रात : १८१४
-महापालिका क्षेत्रात : २२९९
एकूण : १८४२८