सांगली : मंगळवारी दिवसभरात फक्त ५,५५० जणांचे कोरोना लसीकरण झाले. दुपारी बारानंतर सर्रास केंद्रांवर लस संपल्याचे फलक झळकले. त्यामुळे लसीकरणाला ब्रेक लागला.
लसीच्या नव्याने पुरवठ्याबाबत आरोग्य विभागाला मंगळवारी रात्रीपर्यंत कोणताही निरोप नव्हता, त्यामुळे बुधवारी लसीकरण बंदच राहणार असल्याचे स्पष्ट झाले. शनिवारी रात्री ५५ हजार डोस मिळाले होते. मात्र, सोमवारी संध्याकाळपर्यंत साठा संपत आला. मंगळवारी सकाळी अवघे सहा हजार डोस शिल्लक होते. त्यातून दोन-तीन तास लसीकरण चालले. लस संपल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. लोकांना सध्या कूपन देऊन बोलावले जात आहे, त्यातील अनेकांना लस मिळू शकली नाही. महापालिका क्षेत्रातील शहरी आरोग्य केंद्रांमध्ये सकाळी आठपासूनच नागरिकांनी नोंदणीसाठी गर्दी केली होती; पण त्यांना लस उपलब्ध नसल्याचे सांगून परत पाठविण्यात आले.
पुण्याहून बुधवारी किंवा गुरुवारी लस येण्याची शक्यता आहे, त्यानंतर पुन्हा लसीकरण सुरू होईल. मात्र, याबाबतचा कोणताही निश्चित निरोप मंगळवारी रात्रीपर्यंत मिळालेला नव्हता.
चौकट
मंगळवारचे लसीकरण असे
ग्रामीण - ३,४४१
निमशहरी - ८५३
महापालिका क्षेत्रात - ४८०
खासगी रुग्णालये - ७७६
दिवसभरात एकूण - ५,५५०
आजवरचे एकूण - ५,३६,०८१