सुरेंद्र शिराळकर आष्टा: येथील वैभव बाळू घस्ते या युवकाचा दारू न दिल्यामुळे काल, सोमवारी रात्री खून केल्याचे समोर आले. याप्रकरणी मुख्य आरोपी अंकित नरेश राठोड (वय २१,रा. गांधीनगर, आष्टा ) व प्रतीक भरत जगताप (२० रा. योगेश डेअरी जवळ, आष्टा ) या दोघां संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण, सांगली व आष्टा पोलिसांनी अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.वैभव घस्ते हा भाजी मंडई जवळ असलेल्या एका बारमध्ये अंकित राठोड व प्रतीक जगताप हे तिघेजण दारू पीत बसले होते. दरम्यान या तिघांमध्ये दारू देण्याच्या कारणावरून वादावादी सुरू झाली. दारू न दिल्यामुळे चिडलेल्या अंकित राठोड व प्रतीक जगताप यांनी वैभव घस्ते याच्या छातीवर चाकूने वार केला व फरार झाले. दरम्यान ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच वैभव घस्ते याचा मृत्यू झाला.आष्टा पोलीस पथकाने काल, सोमवारी रात्री उशिरा आष्टा-सांगली मार्गावर लक्ष्मी फाट्याजवळ अंकित राठोड व प्रतीक जगताप याला ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता या दोघांनी वैभव घस्तेचा खून केल्याचे कबूल केले. दोघा आरोपींना इस्लामपूर न्यायालयात हजर केले असता गुरुवार (दि23) पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अधिक तपास पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड करीत आहेत.
Sangli: आष्टयातील वैभव घस्तेचा खून दारूसाठी: दोघा संशयित आरोपींना अटक: तीन दिवसाची पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 7:32 PM