सदानंद औंधे
मिरज : व्हॅलेंटाईन डेसाठी दिल्ली व मुंबईत जरबेरा, कार्नेशिया, गुलाब व डच गुलाब या हरितगृहातील फुलांना मागणी असल्याने गेले दोन आठवडे दररोज मिरजेतून रेल्वेने दिल्लीला व्हलेंटाईन डे साठी हरितगृहातील फुलांची मोठ्या प्रमाणात निर्यात सुरू आहे. व्हॅलेंटाईन डेसाठी मागणी असल्याने डच गुलाबाचा दर वधारला आहे.सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात हरितगृहात मोठ्या प्रमाणात डच गुलाबाचे उत्पादन होते. व्हॅलेंटाईन डे साठी हरितगृहातील गुलाबाच्या फुलांना मागणी असल्याने गेले दोन आठवडे मिरजेतून दिल्लीला रेल्वेने फुलांची निर्यात सुरू आहे.
गोवा-निजामुद्दीन एक्स्पे्रसमधून दिल्लीला व महालक्ष्मी एक्स्पे्रसमधून मुंबईला फुले पाठविण्यात येत आहेत. दररोज पाठविण्यात येणाऱ्या गुलाब व जरबेरा फुलांचा दिल्ली व मुंबईत शीतगृहात साठा करण्यात येतो.थंड हवामानामुळे जानेवारी अखेरपासून दिल्लीला फुले पाठविण्यात येत आहेत. व्हॅलेंटाईन डेसाठी मागणी असल्याने एरवी पाच रुपये दर असलेल्या गुलाबाच्या फुलांना पंधरा ते वीस रुपये दर मिळत आहे. मात्र रेल्वे मालवाहतुकीत भाडेवाढीमुळे फुलांची निर्यात महागली आहेत.
दररोज सुमारे दोनशे बॉक्स गुलाब व जरबेरा मिरज रेल्वे स्थानकातून दिल्लीला जात आहेत. दिल्ली परिसरात गुलाबाच्या फुलाचे उत्पादन होत नसल्याने दिल्लीला मुंबईपेक्षा मागणी व दर जास्त आहे.महाशिवरात्रीसाठी पांढऱ्या रंगाच्या फुलांना मागणी असल्याने निशिगंध, लिली, पांढरी शेवंती या फुलांचे दर २५० ते ४०० पर्यंत वाढले आहेत.