वंचित आघाडीला धक्का! शाकिर तांबोळी काँग्रेसमध्ये; वंचितची कार्यकारिणी बरखास्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 01:57 PM2022-09-06T13:57:13+5:302022-09-06T13:59:11+5:30
वंचित बहुजन आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र विभागातील कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त समजताच वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने वंचित बहुजन आघाडीची पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली.
इस्लामपूर : शहरातील संघर्ष समितीचे प्रमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष शाकिर तांबोळी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचे स्वागत केले.
मुंबई येथील पक्षाच्या मुख्य कार्यालयात काँग्रेस प्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी तांबोळी यांच्यासह वंचितचे सांगली जिल्हा महासचिव उमर फारूक काकमरी, सातारा जिल्हा उपाध्यक्ष फारुक पटणी यांनीही कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी पटोले यांनी सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल असे आश्वासन दिले.
यावेळी अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा, प्रदेश सरचिटणीस नंदकुमार कुंभार, देवानंद पवार, प्रदेश सचिव ॲड. भाऊसाहेब अजबे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस विजय पवार, वाळवा तालुका अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष बालम मोमीन यांची प्रमुख उपस्थिती होती.
नौशाद तांबोळी, मौला नदाफ, झाकीर मुजावर, रफिक मणेर, समीर तांबोळी, दिलावर शेख, राजू कांबळे, परवेज पटवेकर, समद मामू उपस्थित होते.
वंचितची कार्यकारिणी बरखास्त.!
वंचित बहुजन आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र विभागातील कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त समजताच वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने वंचित बहुजन आघाडीची पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याचे पत्र प्रदेश अध्यक्षा रेखा ठाकूर यांनी प्रसिध्द केले आहे.