सांगली : दिवाळीसाठी राज्यातल्या कामगारांना राज्य सरकारकडून दिवाळी बोनस मिळावा यासह विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन माथाडीच्या ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार संघटनेकडून कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या सांगलीतील घरावर सोमवारी जन-आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. हा मोर्चा सांगली पोलिसांनी जिल्ह्याच्या सीमेवरच अडविला. यावेळी पोलिस व आंदोलकांत वादावादी झाली. कामगारमंत्र्यांनी पोलिस बळाचा वापर करून मोर्चा अडविल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला.
बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस द्यावा. सांगली जिल्ह्याच्या धर्तीवर कोल्हापूरसह राज्यात बांधकाम कामगारांसाठी घरकुल योजना सुरू करावी, कोल्हापूर जिल्ह्यासाठी कायमस्वरुपी सहाय्यक कामगार आयुक्त द्यावा, बांधकाम कामगारांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास वयाच्या अटीमुळे आर्थिक मदत देण्यात येत नाही. ही अट रद्द करावी, यासह विविध मागण्यासाठी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्यावतीने कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या सांगलीतील घरावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
या मोर्चासाठी कोल्हापूरहून युनियनचे कार्यकर्ते, पदाधिकारी वाहनाने सांगलीकडे येत होते. पोलिसांनी अंकली पुलावरच ही वाहने अडविली. पोलिसांनी बळाचा वापर करून मोर्चा अडविल्याने आंदोलक आक्रमक झाले होते. अखेर कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय गुदगे व पोलिसांत चर्चा झाली. आंदोलकांना पोलिस बंदोबस्तात सांगलीच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणात आणण्यात आले. तिथे आंदोलकांनी आक्रोश व्यक्त केला.
युनियनचे कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत वाघमारे यांनी आठ दिवसात मागण्याबाबत निर्णय न झाल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला. कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्ष फरजाना नदाफ, जिल्हा संघटक लक्ष्मण सावरे, संभाजी कागलकर, सांगली जिल्हा नेते संजय कांबळे, कोल्हापूर जिल्हा महासचिव समाधान बनसोडे, शहर अध्यक्ष भारत कोकाटे, शहर संपर्कप्रमुख गणेश कुचेकर, हातकणंगले तालुका महिला अध्यक्ष सलमा मेमन, उपाध्यक्षा सुहासिनी माने, सविता सोनटक्के, नजमा मोकाशी, कल्पना शेंडगे, किशोर सोनटक्के उपस्थित होते.