सांगली - राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने तयारी सुरू केली आहे. या निवडणुकांत काँग्रेस-शिवसेनेसोबत जाण्यास आम्ही तयार आहोत. त्याबाबतचा प्रस्ताव दोन्ही पक्षांना दिला आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी शिवसेना व काँग्रेसला आघाडीचा प्रस्ताव दिला असला तरी त्यांच्याकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. कुणी बरोबर घेतले नाही, तरी आमची आघाडी या निवडणुका स्वबळावर लढेल. काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढतात तेव्हा त्याचा फायदा भाजपला होता. दोघे वेगवेगळे लढले तर भाजपला तोटा होत असल्याचे आतापर्यंतच्या निवडणुकीत पाहायला मिळाले आहे.
ते म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा विडा राष्ट्रवादीनेच उचलला होता. एकनाथ शिंदे हे दुसरे उद्धव ठाकरे होते. पक्षात दुफळी निर्माण होणार नाही, नैराश्य येणार नाही, ही जबाबदारी त्यांच्यावर होती. परंतू तेच पक्षाच्या नेत्याविरोधात बंड करुन सरकारमधून बाहेर पडले. मराठा समाजातील गरिबांना आरक्षण मिळू नये, अशी व्युहरचना श्रीमंत मराठ्यांची आहे.
राज्यात पावसाने सोयाबिन व मूगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, परंतू विमा कंपन्यांनी २० ते २५ टक्के नुकसान गृहित धरले आहे. पिकांचे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा कमी असल्याने भरपाई मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले. राज्य सरकारने शेतकऱ्यांची आणखी परीक्षा न पाहता विमा कंपन्यांना बोलावून नुकसानीची शंभर टक्के भरपाई देण्यास भाग पाडावे, अशी मागणी आंबेडकर यांनी केली.
"मोदी दहशत निर्माण करू पाहताहेत"
आंबेडकर म्हणाले की, सध्या देशाची वाटचाल राजेशाही, हुकुशाहीकडे सुरू आहे. पंडित नेहरुंनी शांततेसाठी कबुतरे सोडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चित्ते सोडले. यापूर्वी सीबीआय, ईडी, आयकर विभागाच्या माध्यमातून भीती दाखवली. आता तर चित्ते सोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.