लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : उत्कृष्ट कविता निर्मितीसाठी साधना महत्त्वाची आहे. उत्तम कविता लिहायची असेल तर नामवंत कवींच्या कवितांचे वाचन करायला हवे, असे प्रतिपादन साहित्यिक प्रा. वैजनाथ महाजन यांनी केले. आभाळमाया फाऊंडेशनच्या ११ व्या निसर्ग कविसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
आभाळमायाचे अध्यक्ष प्रमोद चौगुले यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, माणसाला सुखाने जगण्यासाठी निसर्गाचे संवर्धन करण्याशिवाय भविष्यात अन्य पर्याय नसेल. निसर्गाला अव्हेरून माणूस जगूच शकणार नाही. यावेळी कवी संमेलनात सुभाष कवडे, दयासागर बन्ने, अभिजित पाटील, गौतम कांबळे, मनीषा पाटील, सुहास पंडित, महेशकुमार कोष्टी, मनीषा रायजादे-पाटील, प्रमोद चौगुले यांनी बहारदार कविता सादर केल्या. निसर्ग, पाऊस, महापूर, श्रावण यांना मध्यवर्ती ठेवून कविता सादर झाल्या. त्यांना रसिकांची उत्स्फूर्त दाद दिली. सूत्रसंचालन मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठल मोहिते यांनी केले. आभार महेशकुमार कोष्टी यांनी मानले.