युनूस शेख ।इस्लामपूर : जीवनातील स्वार्थ, ईर्षा, स्पर्धा, कपटभाव, द्वेष जेथे क्षणात गळून पडतात, अशी जागा म्हणजे स्मशानभूमी.... मात्र याच स्मशानभूमीकडे अस्वच्छ आणि दुर्गंधीचे ठिकाण म्हणूनही नाके मुरडली जातात. तथापि येथील अहिल्यानगरातील ध्येयवेड्या तरुणाने ‘स्मशानभूमी स्वच्छते’चा वसा हाती घेत २९९ स्मशानभूमींची स्वच्छता करून त्रिशतकी स्वच्छतेकडे वाटचाल सुरू केली आहे. चंद्रशेखर प्रकाश तांदळे असे या ध्येयवेड्या आणि उच्च विद्याविभूषित तरुणाचे नाव आहे.
लोकराज्य विद्या फौंडेशनची स्थापना करण्यापूर्वी चंद्रशेखर तांदळे समाजाच्या अनेक प्रश्नांवर आंदोलने करायचा. मोर्चे, उपोषण हे ठरलेलेच. मात्र धनगर समाज आंदोलनाच्या एका आंदोलनात त्याने अवती-भोवती असणाऱ्या पोलिसांचा डोळा चुकवून दगडाने डोके फोडून घेत या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. त्यामुळे जन्म एकदाच मिळतो, पुन्हा पुन्हा मिळत नाही. मिळालेल्या जन्मात समाजासाठी काही तरी चांगले काम करावे, या जाणिवेतून चंद्रशेखरने स्मशानभूमी स्वच्छतेचा संकल्प दोन वर्षांपूर्वी सोडला.
एकवेळ प्रसिद्धीचा स्टंट झाला की असे आरंभशूर आणि त्याचा उपक्रम गायब झाल्याची उदाहरणे पाहायला मिळतात. मात्र चंद्रशेखरने या सर्वांपेक्षा वेगळे काम करताना, त्यातील टिकवून ठेवलेले सातत्य कौतुकास्पद आहे. स्मशानभूमीकडे बघण्याची मानसिकता ही उपेक्षित नजरेचीच असते. तेथील अस्वच्छता, दुर्गंधी, अंत्यविधीचे इतरत्र पडलेले साहित्य, अर्धवट जळालेली लाकडे, वेली, झाडे-झुडपे असा स्मशानभूमीचा माहोल असतो. आपल्याकडे गटारी, चौक स्वच्छ होतात; मात्र स्मशानभूमी नेहमीच अस्वच्छ असते.
नेमक्या याच अस्वच्छतेचे ‘भूत’ डोक्यात घेऊन चंद्रशेखरने केवळ स्मशानभूमीची स्वच्छता केली नाही, तर त्या पलीकडे जात स्मशानभूमीतच अमावास्येच्या रात्री १२ वाजता रक्तदान, महिलांचे हळदी-कुंकू, सलग १८ तास वाचन, कविसंमेलन, भजन-कीर्तन, वक्तृत्व स्पर्धा, महिलांनी वाहिलेल्या प्रतिकात्मक तिरडीला महिलांच्या हातूनच ‘अग्नी’ अशा प्रबोधनात्मक उपक्रमात समाजाच्या डोक्यातील ‘भूत’आणि त्याची आभासी भीती दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. समाजामध्ये निर्भिडता, व्यसनमुक्ती आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे महत्त्व वाढीस लावण्याचा प्रयत्न करत असतो.
चंद्रशेखर तांदळे यांनी आपल्या या ११११ स्मशानभूमी स्वच्छता यज्ञाला सीमा ठेवलेली नाही. इस्लामपुरातून सुरुवात केल्यानंतर त्याने नागपूरची दीक्षाभूमी, वर्ध्याच्या सेवाग्रामची बापू कुटी, कºहाड येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळ, अंजनी येथील आर. आर. आबांचे स्मारक, मिरजेचा मीरासाहेब दर्गा, वाटेगावातील अण्णा भाऊंचे स्मारक, शिवाजीराव शेंडगेबापूंचे समाधीस्थळ, महाकवी ग. दि. माडगूळकर यांचे स्मारक, निवासस्थान अशा परिसरातही स्वच्छता केली आहे.
अनेक स्मशानामध्ये अस्वच्छता असल्याचे आढळून येते. येथील स्वच्छता करतांना अन्य तरुणही त्या मोहिमेत सहभागी होतात. या स्मशानभूमी स्वच्छता अभियानाचे कौतुक होत असल्याने पुन्हा नवी ऊर्जा मिळते. जिथे स्वच्छता केली, त्या गावातील सामाजिक संस्था, मंडळे स्मशानभूमीची स्वच्छता करीत आहेत. त्यामुळे आपल्या अभियानाची व्याप्ती वाढत असल्याचा अभिमान वाटतो.- चंद्रशेखर तांदळे, इस्लामपूर